Breaking News

सुनील तटकरे रायगडला लागलेला कलंक -उद्धव ठाकरे

माणगाव : प्रतिनिधी       

रायगड ही छत्रपती शिवाजी महाराजांची पावनभूमी आहे. शिवरायांनी आपल्या कारकिर्दीत रयतेचे रक्षण करीत राज्य केले, मात्र इथल्या तटकरेंनी शेतकर्‍यांच्या जमिनी लुबाडून घेत त्या आपल्या घशात घातल्या. तटकरे हा रायगडला लागलेला कलंक आहे. अशा कलंकीत तटकरेंना या निवडणुकीत ठेचा, अशी घणाघाती टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली.

रायगड लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, रिपाइं व मित्रपक्षांच्या महायुतीचे उमेदवार खासदार अनंत गीते यांच्या प्रचारार्थ बुधवारी (दि. 17) माणगाव येथील टिकमभाई मेथा कॉमर्स कॉलेजच्या प्रांगणावर भव्य सभा झाली. त्या वेळी ठाकरे बोलत होते.

व्यासपीठावर केंद्रीय मंत्री व उमेदवार अनंत गीते, उद्योगमंत्री सुभाष देसाई, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार सर्वश्री भरत गोगावले, प्रवीण दरेकर, प्रकाश सुर्वे, तुकाराम काते, तसेच विनोद घोसाळकर, जिल्हाप्रमुख रवी मुंढे, नाविद अंतुले, जिल्हा युवा सेना आधिकारी विकास गोगावले, रिपाइंचे कोकण  अध्यक्ष जगदीश गायकवाड, अ‍ॅड. राजीव साबळे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा कोबनाक, संजय कोनकर यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आपल्या 20 मिनिटांच्या भाषणात उद्धव ठाकरेंनी दोन्ही काँग्रेसचा जोरदार समाचार घेतला. राज्यात आणि देशात काँग्रेसच्या राजवटीत अनेक घोटाळे केले. तेच काँग्रेसवाले आज आपल्या जाहीरनाम्यात गरिबी हटाव सांगत आहे. काँग्रेसने 60 वर्षांच्या काळात अनेक घोटाळे करीत गरिबी जनतेची नाही, तर स्वतःची हटविली. त्याचबरोबर सुनील तटकरेंचीही गरिबी हटविली, असा हल्लाबोल करून देशद्रोही काँग्रेस, राष्ट्रवादीला सत्तेपासून दूर ठेवा, असे आवाहनही ठाकरे यांनी केले.

उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आपल्या भाषणात, 2014च्या निवडणुकीत शेकापचे जयंत पाटील यांनी सुनील तटकरेंवर काढलेली श्वेतपत्रिका स्क्रीनद्वारे दाखविली. हा शेतकरी नव्हे, तर भूमाफिया आहे असे पाटील यांनी जाहीर केल्याचे सांगून, एका इलेक्ट्रॉनिक वाहिनीने तटकरेंची केलेली पोलखोलही देसाई यांनी दाखवली. दुसरा घोटाळा कॉरिडॉर आहे. हा घोटाळा करण्यासाठी तटकरेंनी 100 कंपन्या काढल्या. त्याची मी चौकशी सुरू केली आहे. अशा भूमाफिया तटकरेंना जेलशिवाय दुसरा पर्याय नाही. याउलट अनंत गीतेंवर एक तरी डाग आहे का, असा सवाल देसाईंनी करून त्यांनाच विजयी करण्याचे आवाहन केले.

या वेळी अनंत गीते यांनी उपस्थित मतदार, शिवप्रेमींचे आशीर्वाद घेण्यासाठी व्यासपीठावर नतमस्तक होऊन साष्टांग नमस्कार केला. ते म्हणाले की, कोकण रेल्वे चौपदरीकरण, पाणी योजना यासारखी विविध विकासकामे मार्गी लावण्यासाठी मी प्रयत्न केले. तरीही तटकरे निर्लज्जपणे विचारतात गीतेंनी काय केले? मी सव्वा ते दीड लाखाच्या मताधिक्क्याने विजयी होणार, असा ठाम विश्वास व्यक्त केला.

या सभेस सभापती सुजित शिंदे, तालुकाप्रमुख अनिल नवगणे, रोहा तालुकाप्रमुख समीर सकपाळ, सुरेंद्र म्हात्रे, बाळ लोखंडे, भाजप तालुका अध्यक्ष संजय ढवळे, नितीन बामगुडे, सचिन बोंबले, दक्षिण रायगड महिलाप्रमुख सुवर्णा करंजे, कुणबी समाज अध्यक्ष भूषण बरे, सुलतान मुकादम आदींसह जनसमुदाय उपस्थित होता.

‘शेकापलाही जनता धडा शिकवेल’

या वेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्वव ठाकरेंनी शेकाप नेते जयंत पाटील यांच्यावरही शरसंधान साधले. मागील निवडणुकीत जमीन व सिंचन घोटाळे करणार्‍या सुनील तटकरेंच्या विरोधात श्वेतपत्रिका काढून त्यांच्या बेगड्या चेहर्‍याचा बुरखा जयंत पाटलांनी फाडला होता, मात्र तेच पाटील या निवडणुकीत तटकरेंच्या गळ्यात गळे घालून प्रचारात गरळ ओकत आहेत. असे भाई मी बरेच बघितलेत. तुम्हाला भाऊ म्हणून मी समजवत आहे तुम्ही वेळीच सावरा; अन्यथा तुम्हालाही शिवप्रेमी जनता तुमची जागा दाखवेल, असा इशारा ठाकरे यांनी दिला.

Check Also

‘हिंद दी चादर’ गुरू तेग बहादूर यांचा 350वा शहिदी समागम

दोन दिवसीय भव्य कार्यक्रमासाठी खारघर सज्ज पनवेल : रामप्रहर वृत्तहिंदुस्थानी संस्कृती आणि मानवी मूल्यांच्या रक्षणासाठी …

Leave a Reply