Breaking News

पनवेलमधील शिवरायांच्या पुतळ्याला मावळे, हत्तींचा साज

सभागृह नेते परेश ठाकूर यांचे सर्वत्र कौतुक

पनवेल : नितीन देशमुख
पनवेल शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याजवळील उद्यानात मावळे आणि झूल घातलेल्या हत्तींचे शिल्प बसवण्यात आल्याने येथील चौकाच्या सौंदर्यात भर पडली असून, पनवेलकर हे शिल्प पाहण्यासाठी आणि त्याचे फोटो काढण्यासाठी गर्दी करू लागले आहेत. महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर यांनी शहराच्या सौंदर्यीकरणात भर घालण्यासाठी केलेल्या या पाठपुराव्याबद्दल त्यांचे कौतुक करण्यात येत आहे.    
पनवेल ही रायगड जिल्ह्यातील पहिली महापालिका आहे. कोकणचे प्रवेशद्वार असलेल्या पनवेल शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी त्यांच्या पुतळ्याच्या सुशोभीकरण निविदेला स्थायी समितीच्या 1 मार्च 2019 रोजी तत्कालीन सभापती मनोहर म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत मंजुरी देण्यात आली होती.
या सभेत छत्रपती शिवाजी महाराज आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा सौंदर्यीकरणासाठी मे. सोनाली कन्स्ट्रक्शन यांच्या न्यूनतम एक कोटी 42 लाख 54 हजारांची निविदा मंजूर करण्यात आली. यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याची त्याच जागी उंची वाढवणे आणि दोन्ही पुतळ्यांच्या परिसराच्या सौंदर्यीकरणाची तरतूद आहे.  
कोरोनामुळे संपूर्ण देशात 24 मार्चपासून लॉकडाऊन लागू करण्यात आला. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज चौकातील सौंदर्यीकरणाचे कामही बंद झाले होते. जून महिन्यापासून या कामाला पुन्हा एकदा सुरुवात झाली असून, मंगळवारी (दि. 9) सकाळपासून मावळे आणि हत्तींचे पुतळे बसवण्याचे काम हाती घेण्यात आले.
अशी आहे रचना
या परिसराचे संपूर्ण दगडी बांधकाम करण्यात आले आहे. 528 चौरस मीटरच्या या जागेत 100 मीटर चौथरा बांधण्यात आला आहे. त्याची उंची साडेपाच फूट इतकी आहे. त्याचबरोबर पाठीमागे भिंत बांधण्यात आली आहे. शिवाय परिसराला पाच फुटांची संरक्षक भिंत आहे. यामध्ये जाळीच्या आवरणात 11 दगडी बुरुजांची बांधणी करण्यात आली आहे.
रोषणाई अन् फ्रेम
महाराजांच्या पुतळ्यासमोर सहा फूट उंचीचे 15 मावळ्यांचे शिल्प उभारण्यात येत आहे. त्याचबरोबर आठ फूट उंचीचे दोन हत्ती, घोडे, दोन तोफा या ठिकाणी बसवण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. याशिवाय परिसरात हिरवळ आणि विद्युत रोषणाईही करण्यात येणार आहे. यामध्ये शिवकालीन वेगवेगळ्या प्रसंगांच्या एकूण 14 फ्रेम्स असणार आहेत.

छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक पनवेलच्या मध्यवर्ती ठिकाणी इतक्या सुंदर पद्धतीने उभारले जाईल अशी कल्पनाच केली नव्हती. येथील मावळे, हत्ती पाहून इतिहास जिवंत झाल्यासारखा वाटतो. असे स्मारक बनवण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल सभागृह नेते परेश ठाकूर यांना धन्यवाद!
-उन्मेष नागले, नागरिक

रायगडचे प्रवेशद्वार असलेल्या पनवेल शहरात महापालिकेने छत्रपती शिवाजी महाराजांचे बनवलेले स्मारक पाहून मनाला समाधान मिळते. येथील महाराजांचा अश्वारूढ पुतळा, बाजूला मावळे व झूल घातलेले हत्ती पाहून मन प्रसन्न झाले. यासाठी सभागृह नेते परेश ठाकूर यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.
-वैशाली पाटील,  शिवप्रेमी नागरिक

Check Also

सिडको प्रकल्पग्रस्तांची गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करण्याबाबत बैठक

प्रकल्पग्रस्तांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण बाबींचा समावेश करा -आमदार प्रशांत ठाकूर मुंबई : रामप्रहर वृत्त सिडको प्रकल्पग्रस्तांनी …

Leave a Reply