तब्बल पाच कोटींचे नुकसान; पावसाळ्यात दुरुस्तीचे आव्हान
कर्जत ः बातमीदार – निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्यातील 250 शासकीय इमारतींच्या छपरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जिल्हा परिषदेच्या शाळा, ग्रामपंचायत कार्यालये, स्मशानभूमी शेड, समाज मंदिरे, प्राथमिक आरोग्य केंद्र, आरोग्य उपकेंद्र, अंगणवाडी केंद्र आणि पशुवैद्यकीय दवाखाने आदी 250हून अधिक वास्तूंचे तब्बल पाच कोटी रुपयांचे नुकसान वादळी वार्याने केले आहे. दरम्यान, शाळा आणि अंगणवाडी केंद्र लॉकडाऊन असल्याने बंद आहेत, मात्र अन्य सरकारी कार्यालयातील कर्मचार्यांना पावसामुळे कामकाज करणे कठीण होऊन बसले आहे.
निसर्ग चक्रीवादळ कर्जत तालुक्यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात घोंगावले. त्यात 6250 घरांचे नुकसान झाले असून मोठ्या प्रमाणात झाडे कोलमडली आहेत. त्यात मोठ्या प्रमाणात शासकीय मालमत्तांचे नुकसान झाले असून त्या नुकसानीची आकडेवारी तब्बल पाच कोटींपर्यंत जात आहे. शासकीय मालमत्तांच्या नुकसानीत प्रामुख्याने रायगड जिल्हा परिषदेच्या शाळा आणि त्या शाळांच्या बाजूला असलेली शौचालये, अंगणवाडी केंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, आरोग्य उपकेंद्र, पशुवैद्यकीय दवाखाना, समाज मंदिरे, ग्रामपंचायत कार्यालये आणि स्मशानभूमी यांचा समावेश आहे. त्या सर्वांची आकडेवारी ही 250 इतकी असून प्रामुख्याने कर्जत तालुक्याच्या पूर्व भागात हे नुकसान सर्वाधिक आहे.त्यात ओलमण, नांदगावपासून कडावपर्यंत मोठ्या प्रमाणात वादळ आले होते. शासकीय मालमत्तांचे झालेले नुकसान हे शासनाला त्या वास्तूंची दुरुस्ती करून भरून काढावे लागणार आहे. त्यात सध्याचा पावसाळा लक्षात घेता कशा पद्धतीने दुरुस्तीची कामे केली जाणार याकडेदेखील लक्ष लागले आहे.
कर्जत तालुक्यातील कडाव, आंबिवली आणि मोहिली या तीन प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या छपरांचे नुकसान झाले आहे, तर आरोग्य केंद्रांच्या पाच उपकेंद्रांचीदेखील छपरे उडून गेली आहेत. तालुक्यातील 26 अंगणवाडी केंद्रांचे छप्पर वादळाने उडून गेले आहे. पिंगळस येथील पशुवैद्यकीय दवाखान्याचे वादळाने नुकसान केले असून ग्रामीण भागातील 12 समाज मंदिरांचे छपरे उडून गेली आहेत. चार ग्रामपंचायत कार्यालयांच्या इमारतीचे मोठे नुकसान झाले असून तब्बल 52 स्मशानभूमींचे शेड उडून गेले आहेत. रायगड जिल्हा परिषदेच्या 120 शाळांची छपरे वादळाने उडाली आहेत. तसेच प्राथमिक शाळांच्या बाजूला असलेल्या शौचालयांचेही नुकसान झाले आहे. खासगी शाळांचेदेखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून नेरळ विद्यामंदिर, कडाव श्री गजानन विद्यालय यांच्यासह जांबरुंग येथील खासगी शाळांचे नुकसान झाले आहे.