कर्जत ः बातमीदार – निसर्ग चक्रीवादळाने नुकसान झालेल्या कर्जत तालुक्यातील शिंगढोळ गावातील कुटुंबांना रोटरी क्लबने मदतीचा हात दिला असून, रोटरीच्या मदतीमुळे या ग्रामस्थांना आपल्या घरावर पुन्हा छप्पर टाकता आले आहे.
निसर्ग चक्रीवादळात कर्जत तालुक्यातील दुर्गम भागात रजपे ग्रामपंचायतमधील शिंगढोळ गावाची भयानक परिस्थिती झाली होती. वादळ वार्यात गावातील सर्व घरांची पडझड झाली होती. छत उडाल्याने पावसाळा सुरू होत असताना घरात कसे राहायचे, असा प्रश्न कुटुंबांना पडला होता. कर्जत रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष आणि शिंगढोळ गावचे ग्रामस्थ रामदास घरत यांनी ही माहिती रोटरीच्या निदर्शनास आणली. त्यानुसार सर्व आदिवासी बांधवांना आणि गावातील काही गरजूंना सिमेंट पत्र्यांचे वाटप रोटरी क्लबच्या माध्यमातून करण्यात आले, तर पडझड झालेल्या घरांच्या दुरुस्तीसाठी सिमेंट बॅगदेखील रोटरीकडून पुरविण्यात आल्या आहेत.
रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3131 सन 2018/19 वर्षीच्या सर्व अध्यक्षांच्या माध्यमातून ग्रुपने शिंगढोळ गावातील आदिवासी समाजाचे उद्ध्वस्त झालेले संसार पुन्हा उभे करून देण्यासाठी मदत केली. शिंगढोळ गावातील नुकसानग्रस्त रहिवाशांना मदत व्हावी यासाठी रोटरीच्या संजीवनी मालवणकर, चारू श्रोत्री, सुनील कुरूप, हेमंत जेरे, राजेश राऊत, मंजू फडके तसेच प्रांतपाल रोटरीयन डॉ. शैलेश पालेकर यांनी विशेष पुढाकार घेतला. शिंगढोळ गावात सामाजिक कार्यकर्ते रामदास घरत आणि नितीन ढमाले यांच्या माध्यमातून रोटरी क्लबची मदत पोहचली आहे.