Breaking News

मुरूडमध्ये मुस्लिम तरुणांकडून स्वच्छता मोहीम

मुरूड : प्रतिनिधी
येथील अंजुमन दर्दमंडले तालिमो तरकी या सामाजिक संस्थेच्या वतीने शनिवारी (दि. 13) मुरूड शहरात स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली. या वेळी सुमारे दोनशे मुस्लिम युवकांनी रस्त्यावर उतरून चक्रीवादळामुळे पडलेली झाडे, कचरा साफ केला.
मुरूड शहराला निसर्ग चक्रीवादळाचा मोठा फटका बसला. नारळ, सुपारी व इतर झाडे उन्मळून पडल्याने शहराच्या सर्व भागात कचरा झाला होता. वाडीमालकांनी आपला कचरा रस्त्याच्या कडेला टाकून दिल्याने रस्त्यांच्या दुतर्फा कचराच कचरा झाला होता. त्यामुळे शहरात कचर्‍याचे साम्राज्य पसरले होते. ही परिस्थिती पाहून अंजुमन दर्दमंडले तालिमो तरकी या सामाजिक संस्थेच्या युवकांनी साफसफाई करण्याचा निर्धार केला. यासाठी त्यांनी नगर परिषदेची परवानगी घेऊन संस्थेचे अध्यक्ष मौलाना शाहिद ददनाक यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी सकाळी स्वच्छता मोहीम राबविण्यास सुरुवात केली. साफसफाईकरिता सर्व युवकांना हॅण्डग्लोज देण्यात आले होते.
स्वच्छता मोहिमेसाठी विविध विभागात 20 ट्रक तैनात करण्यात आले होते. शहरातील प्रत्येक पाखाडीमधून झाडांचा पालापाचोळा गोळा करण्यात येत होता व तो ट्रकमध्ये भरून पालिकेच्या तेलवडे येथील डम्पिंग ग्राऊंडवर टाकण्यात आला. या वेळी बाजारपेठ व पेठ मोहल्ला मुस्लिम जमातीचे उत्तम सहकार्य लाभल्याने स्वच्छता मोठ्या प्रमाणात करण्यात यश मिळाले. हिंदू बांधवांचे सहकार्य लाभल्याने त्यांचेही आभार व्यक्त करण्यात आले.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply