कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी ग्रामस्थांचा निर्णय
कर्जत : बातमीदार
नेरळ ग्रामपंचायत हद्दीत आणि ग्रामपंचायत हद्दीला लागून असलेल्या भागात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर नेरळची बाजारपेठ सलग तीन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाला सोमवारी (दि. 15) पहिल्याच दिवशी प्रतिसाद लाभला.
नेरळ गावात मोहाचीवाडी आणि खांडा भागात कोरोनाचे दोन अॅक्टिव्ह रुग्ण असून, ग्रामपंचायत हद्दीला लागून कोरोनाचे आणखी चार रुग्ण आहेत, तर त्यातील एका रुग्णाच्या संपर्कात 300हून अधिक लोक आल्याची शक्यता लक्षात घेऊन कोरोनाच्या संसर्गाची साखळी वाढू नये यासाठी खबरदारी म्हणून नेरळची बाजारपेठ सोमवारपासून पुढील तीन दिवस बंद ठेवण्यात येणार आहे. हा निर्णय रविवारी प्रथम व्यापारी फेडरेशन आणि नंतर नेरळ ग्रामपंचायत तसेच व्यापारी फेडरेशन यांनी एकत्र येऊन घेतला.
बंदच्या निर्णयानुसार सोमवारी दुपारी 12पर्यंत दुकाने उघडी ठेवण्यासाठी वेळ देण्यात आली होती, मात्र प्रत्यक्षात बाजारपेठ बंद होण्यास दुपारचे 2 वाजले. आता पुढील अडीच दिवस नेरळ गावातील तसेच कोल्हारे आणि ममदापूर ग्रामपंचायत हद्दीत नव्याने निर्माण झालेली बाजारपेठ बंद ठेवली जाणार आहे. त्यात मेडिकल, डॉक्टर आणि दूध वगळता सर्व व्यवहार बंद असणार आहेत. यापूर्वी नेरळमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आल्यानंतरदेखील सलग दिन दिवस बाजारपेठ आणि अत्यावश्यक सेवा बंद ठेवण्यात आल्या होत्या.