म्हसळा : प्रतिनिधी
मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केल्या गंभीर आरोपांवरून गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा, अशा आशयाचे पत्र म्हसळा भाजपच्या वतीने पोलीस निरीक्षकांना देण्यात आले. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी लेखी पत्राद्वारे दरमहा रुपये 100 कोटी वसूल करून देण्याबाबतचे आरोप केले आहेत. हे आरोप शासनातील एका वरिष्ठ पोलीस अधिकार्याची लेखी पत्राद्वारे राज्याच्या गृहमंत्र्यावर होणे ही बाब पुरोगामी महाराष्ट्राला अतिशय लांच्छनास्पद आहे. याशिवाय सचिन वाझेंनी हिरेन यांची हत्या केल्याचा आरोप त्यांच्या पत्नीने केलेला आहे. पुजा चव्हाण यांचा संशयास्पद मृत्यू या शिवाय महाराष्ट्राला गेल्या दीड वर्षापासून कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. याबाबत त्यांचा म्हसळा तालुका भारतीय जनता पक्ष जाहीर निषेध करीत आहे. तरी या आरोपानुसार गृहमंत्री यांनी तत्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी म्हसळा तालुका भारतीय जनता पक्षाकडून करण्यात आली आहे. निवेदन देताना भाजप तालुका अध्यक्ष प्रकाश रायकर, तालुका सरचिटणीस सुनील शिंदे, महेश पाटील, महिला मोर्चा तालुका अध्यक्षा प्रभारी सुनंदा महेश पाटील, तालुका चिटणीस मनोहर जाधव, युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष प्रशांत महाडीक, ज्येष्ठ मोर्चा सरचिटणीस सुधाकर शिर्के आदी उपस्थित होते.