नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
जगावर कोरोनाचे संकट ओढवले असताना जगभरात रविवारी (दि. 21) सहावा आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. योग दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांशी संवाद साधला. या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना महामारी आणि योगविषयी भाष्य केले. योग दिवस विश्व बंधुत्वाचा संदेश देणारा दिवस असून, जो आपल्याला जोडतो, एकत्र आणतो, तोच तर योग आहे. जो अंतर संपवतो तोच तर योग आहे. योग केल्याने आपले मानसिक व शारीरिक आरोग्य अधिक सुदृढ बनते. त्यामुळे व्यायाम करण्याबरोबरच योगालाही आयुष्याचा भाग बनवा, असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी देशवासीयांना केले.
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, कोरोनाच्या संकट काळात जगभरातील लोकांनी माय लाईफ माय योग या स्पर्धेत सहभाग घेत लोकांचा योगाविषयी उत्साह वाढत असल्याचे दाखवून दिले आहे. या वर्षी योगाचे ब्रीद घरातच योग, कुटुंबासोबत योग आहे. आज सगळे कुटुंबासोबत योग करीत आहेत. योगाच्या माध्यमातून सगळे एकत्र येतात, तेव्हा संपूर्ण घरात ऊर्जेचा संचार होता. कौटुंबिक बंध वाढवण्याचाही हा दिवस आहे. कोरोनाच्या संकटामुळे जग योगाला पूर्वीपेक्षा अधिक गांभीर्याने घेत आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी स्पष्ट केले.
आपली रोगप्रतिकारशक्ती चांगली असेल तर कोरोनाला हरवण्यास मदत होते. कोरोना विशेषतः आपल्या श्वसन संस्थेवर हल्ला करतो. त्यामुळे आपल्या श्वसन संस्थेला सुदृढ करण्यासाठी प्राणायाम फायदेशीर ठरतो. एक सजग नागरिक म्हणून आपण कुटुंब व समाजासह एकजुटीने पुढे जाऊ. घरात व कुटुंबीयांसोबत योग करण्यासाठी आपण प्रयत्न करू. योगाला आपल्या आयुष्याचा भाग बनवा, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.योगामुळे मानसिक शांती, संयम व सहनशक्ती प्राप्त होते. कितीही वाईट परिस्थितीत क्रियाशील राहण्याची शक्ती योगामुळे मिळते. योग करणारी व्यक्ती कधीही घाबरत नाही. कोणत्याही परिस्थितीत स्थिर राहणे हेच तर योग आहे. योगा सर्व भेदभावांच्या वर आहे. तो कुणीही करू शकतो. योगामुळे जीवनात अधिक सक्षम बनण्याची क्षमता प्राप्त होते. निष्काम कर्मयोगाची भावना भारताच्या नसानसात आहे. जेव्हा जेव्हा गरज पडली, तेव्हा जगाने याचा अनुभव घेतला आहे. स्वतःच्या, आपल्या स्वकीयांच्या आरोग्यासाठी सजगपणे एकजुटीने पुढे जाऊ या, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नमूद केले.
RamPrahar – The Panvel Daily Paper