पेण : प्रतिनिधी
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पेणच्या नगराध्यक्ष प्रीतम पाटील यांनी व्यापारीवर्ग, दुकानदार व नागरिकांना चार दिवस जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत पेणकरांनी गुरुवारी (दि. 25) पहिल्याच दिवशी कडकडीत बंद पाळला.
पेणमध्ये मागील आठवड्यापासून कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. हा संसर्ग रोखण्यासाठी पेण शहरात जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन नगराध्यक्ष प्रीतम पाटील यांनी केले होते तसेच गुरुवारी त्यांनी स्वतः ाजारपेठ व इतर भागांत फिरून 25 ते 28 जूनपर्यंत बंद पाळण्याचे आवाहन केले. या वेळी त्यांनी सांगितले की, चार दिवस बंद पाळल्याने छोटे व्यापारी, फेरीवाले यांचे काही प्रमाणात नुकसान होईल याची जाणीव आहे. झालेले नुकसान पुढील काळात भरून निघेल, परंतु मला माझ्या नागरिकांचा जीव मोलाचा असून, कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी हे पाऊल गरजेचे आहे. कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यात हातभार लावून बंदला प्रतिसाद दिल्याद्दल त्यांनी पेणकरांचे या वेळी आभारही मानले. नगराध्यक्ष पाटील यांच्यासोबत उपनगराध्यक्ष वैशाली कडू, सभापती दर्शन बाफना, तेजस्विनी नेने, नगरसेवक दीपक गुरव, नगरसेविका अश्विनी शहा, भाजप शहर अध्यक्ष हिमांशू कोठारी, उपाध्यक्ष अजय क्षीरसागर, अभिराज कडू, कन्हय्या पुनमिया, प्रभाकर म्हात्रे आदी होते.