Breaking News

कर्जतमध्ये एकच व्हेंटिलेटर

शासनाच्या कोविड सेंटरमध्ये रुग्णांची होतेय गैरसोय

कर्जत : बातमीदार – कर्जत तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या तीनशेचा आकडा गाठायला गेली आहे.अशा परिस्थितीत येथील एकमेव कोविड केअर सेंटरमध्ये सर्व सुविधा उपलब्ध नसल्याने कोरोना रुग्णांना तेथे पोहोचल्यानंतर अन्यत्र हलवण्याची सूचना केली जात आहे. दरम्यान, एकमेव व्हेंटिलेटर असलेल्या रायगड हॉस्पिटलमधील शासनाच्या कोविड केअर सेंटरमध्येही सुविधांची अनास्था असून ही कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांसाठी धोकादायक अशीच आहे.

रायगड जिल्हाधिकार्‍यांकडून कर्जत तालुक्यासाठी खासगी रुग्णालय असलेल्या रायगड हॉस्पिटलला कोविड केअर सेंटरचा दर्जा देण्यात आला आहे. या रुग्णालयात शासनाने 100 बेड्सचे कोविड केअर सेंटर सुरू केले असून, हॉस्पिटलमधील अन्य भागात रायगड हॉस्पिटल प्रशासनाने स्वतःचे खासगी डेडीकेटेड कोविड सेंटर सुरू केले आहे. तालुक्यातील सर्वपक्षीय समितीने 5 जुलै रोजी प्रशासनाकडे कोविड हॉस्पिटलची मागणी केली होती. त्यानुसार राज्य शासनाच्या वतीने प्रशासनाने कोरोना रुग्णांसाठी कोविड केअर सेंटर सुरू केले. त्या ठिकाणी शासनाने 100 बेड्ची व्यवस्था तेथील एका मजल्यावर केली आहे तसेच सर्व रुग्णांसाठी आवश्यक असलेली ऑक्सिजन पाइपलाइन सर्व बेडस्च्या आजूबाजूला फिरवून घेतली, पण 7 जुलै रोजी कडाव येथील कोरोना रुग्ण रायगड हॉस्पिटलमध्ये नेण्यात आला, त्या वेळी त्या रुग्णाला व्हेंटिलेटरची आवश्यकता असल्याचे तेथील डॉक्टरांचे म्हणणे होते, मात्र जादा व्हेंटिलेटर नसल्याने त्या रुग्णाला पुन्हा पनवेल येथे नेण्याची वेळ आरोग्य विभागावर आली.

मागील काही दिवस कर्जत तालुक्यात सातत्याने कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. ही वाढती संख्या लक्षात घेता तालुक्यातील एकमेव कोविड केअर सेंटर असलेल्या रायगड हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटर हे शासनाचे नसल्याने प्रशासनाने उभारलेले विनाव्हेंटिलेटरचे कोविड रुग्णालय काय कामाचे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यात कर्जत उपजिल्हा रुग्णालयात असलेले व्हेंटिलेटर मशीन शासनाने तत्काळ रायगड हॉस्पिटलमधील कोविड केअर सेंटर साठी हलवण्याची मागणीदेखील पुढे येत आहे. याबाबत तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सी. के. मोरे यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला असता, फोनवर बोलणे झाले नाही.

Check Also

‘हिंद दी चादर’ गुरू तेग बहादूर यांचा 350वा शहिदी समागम

दोन दिवसीय भव्य कार्यक्रमासाठी खारघर सज्ज पनवेल : रामप्रहर वृत्तहिंदुस्थानी संस्कृती आणि मानवी मूल्यांच्या रक्षणासाठी …

Leave a Reply