Breaking News

लॉकडाऊनच्या घोषणेने बाजारात गर्दी; नियमांची पायमल्ली

नागोठणे : प्रतिनिधी – 15 जुलै म्हणजेच बुधवार सकाळपासून लॉकडाऊन होत आहे या गैरसमजातून नागोठणे येथील बाजारपेठेत मंगळवारी (दि. 14) ग्राहकांची झुंबड उडाली असल्याचे चित्र दिसून आले. खरेदीसाठी प्रत्येक दुकानांसमोर प्रचंड अशी गर्दी जमत असल्याने सोशल डिस्टन्सिंगचेसुद्धा या निमित्ताने तीन तेरा वाजले.

रायगड जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या दररोज वाढत आहे. त्याला पायबंद बसावा यासाठी अलिबाग येथे बैठक घेण्यात येऊन त्यात 15 जुलैच्या मध्यरात्री 12 वाजल्यापासून 24 जुलैच्या मध्यरात्री 12पर्यंत संपूर्ण जिल्ह्यात कडक लॉकडाऊन घेण्याचा निर्णय घेण्यात आला. हा निर्णय काही वेळातच सोशल मीडियावर व्हायरल होऊन नागोठण्यासह विभागातील गावे तसेच दुर्गम भागातील आदिवासी वाड्यांवर पोहोचला, पण 15 जुलैची मध्यरात्र म्हणजे बुधवारपासून दुकाने बंद होतील हा समज करून मंगळवारी सकाळपासून ग्राहकांनी शहराकडे धाव घेतली. गिर्‍हाईकांच्या प्रचंड अशा गर्दीने शहरातील मोठी दुकाने ग्राहकांनी फुलून गेली होती, मात्र कोरोनाच्या महामारीकडे ग्राहकांनी तसेच दुकानदारांनी दुर्लक्ष केल्याने सोशल डिस्टन्सिंगकडे सोयीप्रमाणे पाठ फिरवल्याचे स्पष्ट झाले.

जिल्हा प्रशासनाकडून लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्यावर काय सुरू असेल व बंद असेल असे ठरविण्यात आले असून, त्याचा स्पष्ट उल्लेखसुद्धा करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 23 मार्चला पहिला देशव्यापी लॉकडाऊन जाहीर केला होता व कालांतराने आतापर्यंत काहींना आता सूट दिली असली तरी ज्या ठिकाणी कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत त्यावर स्थानिक पातळीवर जनता कर्फ्यूसुद्धा घेतला जात आहे, मात्र नागोठणे शहरात याला हरताळ फासून कोणाच्या तरी आशीर्वादाने दूध विक्रीच्या नावाखाली दररोज इतर पदार्थ विकण्यात काहीजण मश्गुल आहेत आणि मिठाईची काही दुकाने यात आघाडीवर असल्याचे स्पष्ट होत आहे, तर ज्यांच्या घरातच किराणा तसेच दूध आणि साहित्य विकण्याची दुकाने थाटली आहेत त्यांचेसुद्धा यात उखळ पांढरे होत आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply