नवी मुंबई : बातमीदार
येथील महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी रंगावलीकार श्रीहरी पवळे यांच्या कलेचे कौतुक केले आहे. बांगर यांनी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची रांगोळी रेखाटली होती.
वाशी येथील मध्यवर्ती छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील शिवरायांच्या भव्य अश्वारूढ पुतळा आणि शिवचरित्राचे शिल्पमय दर्शन घडविणार्या आकर्षक वास्तूमुळे नवी मुंबई शहराच्या नावलौकिकात व सौंदर्यात भर पडते. महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणार्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती उत्सवानिमित्त प्रत्येक वर्षी या चौकामध्ये आकर्षक पुष्पसजावट करण्यात येते तसेच रात्रीही विद्युतदीपमाळा सजावट व नयनरम्य रोषणाईमुळे चौकाला वेगळीच शोभा येते.
या शोभेमध्ये अधिकची भर शिवरायांची प्रतिमा असणार्या रांगोळीमधून घालण्यात आली असून ही रांगोळी चितारणारे नवी मुंबईतील नामांकित रंगावलीकार श्रीहरी पवळे हे शिवचरित्र शिल्पवास्तूसमोर असणार्या गोलाकार जागोमध्ये रांगोळी काढत असताना महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी त्या ठिकाणी भेट देऊन त्यांच्या कलाविष्काराचे कौतुक केले. शिवरायांची प्रतिमा रांगोळीतून कॅनव्हासवर चित्र काढल्यासारखी रेखाटल्याचा विशेष उल्लेख करीत आयुक्तांनी रांगोळीसारखी पारंपरिक कला आधुनिक स्वरूपात जपण्याचे काम करीत असल्याबद्दल पवळे यांची प्रशंसा केली.