नवी मुंबई ः प्रतिनिधी
टाळेबंदी काही प्रमाणात शिथिल करण्यात आल्यानंतर नवी मुंबईत विविध ठिकाणी बाजार सुरू झाले आहेत. या वेळी नागरिकांनी सावधगिरी बाळगत बाजारात खरेदीला सुरुवात केली. अनेकांनी टाळेबंदीच्या धास्तीने सामाजिक अंतर पाळत खरेदी केली. शहरात 3 ते 10 जुलै या काळात टाळेबंदी जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर ती सात दिवसांसाठी वाढविण्यात आली. याविरोधात व्यापार्यांनी संताप व्यक्त केला होता.
पहिली टाळेबंदी उठविण्यात आल्यानंतर शहरातील प्रतिबंधित क्षेत्रात प्रथम 29 जून ते 3 जुलै अशी सहा दिवसांची टाळेबंदी जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला. याच वेळी इतर ठिकाणी नागरिकांच्या हालचालींवर कोणतेही निर्बंध घालण्यात आले नव्हते, मात्र हा नियम बदलून लगेच 10 दिवसांची टाळेबंदी लागू करण्यात आली. त्यानंतर सात दिवसांची टाळेबंदी जाहीर करण्यात आली. या निर्णयाला नवी मुंबईतील व्यापार्यांनी विरोध केला होता. याच काळात नवी मुंबई पालिका आयुक्तपदी अभिजित बांगर यांची नियुक्ती करण्यात आली. आयुक्तांनी 20 जुलैपासून टाळेबंदीतील काही नियम शिथिल करण्यात आल्याचे जाहीर केले. त्यामुळे प्रतिबंधित क्षेत्र वगळता इतर ठिकाणच्या बाजारात नागरिकांना खरेदीसाठी मुभा देण्यात आली. यात तयार कपड्यांची दुकाने, वाहन दुरुस्ती करणारी दुकाने उघडण्यात आली. या काळात मुखपट्टी बांधून अनेकांनी सामाजिक अंतराचा नियम पाळला. टाळेबंदीचे काही नियम शिथिल करण्यात आल्याने नागरिकांना आवश्यक वस्तूंची खरेदी करता येईल. नियमांची काटेकोर अंमलबजावणी करून लोक खरेदी करीत आहेत.