पनवेल ः प्रतिनिधी
खारघरमध्ये राहणार्या मामा-भाच्याला पॅनासोनिक कंपनीचे सोलारवर चालणारे एसी विक्रीची डिलरशिप मिळवून देण्याचा बहाणा करून मामा व त्याच्या भाच्याला 85 लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी खारघर पोलीस ठाण्यात चोरांच्या टोळीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फसवणूक झालेल्या मामा-भाच्याचे नाव नंदकुमार द्विवेदी व राजेश दवे असे आहे. खारघरमध्ये राहणारे मामा भाचा हे बिल्डिंग मटेरियअल सप्लाय व रिअल इस्टेटचा व्यवसाय करतात. फेब्रुवारी 2017मध्ये या प्रकरणातील टोळीने एका इंग्रजी वर्तमानपत्रात इ. एस. आर. एनर्जी सेल्फ रिलायन्स प्रा. लि. या कंपनीच्या वतीने सोलर पॉवर टोटल सोल्युशनचे डिस्ट्रीब्युटर्स नेमण्यात येत असल्याची जाहिरात प्रसिद्ध केली होती. सदर जाहिरातीत सोलर किट शून्य टक्के व्याजाने देण्याचे व त्यामुळे वीज बिल शून्य टक्के येईल तसेच त्याचा फायदा पर्यावरणास होणार असल्याची माहितीही दिली होती. ही जाहिरात पाहून सदर कंपनीच्या माध्यमातून भागीदारीत व्यवसाय सुरू करण्याचा मामा व त्याच्या भाच्याने निर्णय घेतला व सदर कंपनीसोबत बोलणी सुरू केली. त्या वेळी कंपनीने त्यांना नवी मुंबईची डिस्ट्रीब्युटरशिप देण्याचे आश्वासन दिल्याने या दोघांनी सदर व्यवसाय सुरू करण्यासाठी आरव एंटरप्रायझेस नावाची कंपनी सुरू केली.
सदर कंपनीत संपर्क साधल्यानंतर हसिम इब्राहिम याने भारतात सोलरवर चालणारा पहिला (एसी) किट त्याने स्वत: बनविल्याचे व त्याबाबत त्याने पॅनासोनिक कंपनीसोबत करार केल्याचे सांगितले. तसेच पॅनासोनिक कंपनीने भारतात डिस्ट्रीब्युटर नेमण्याचे सर्व हक्क त्यांच्या कंपनीला दिल्याचे सांगितले. त्यानंतर इब्राहिमने त्यांना नवी मुंबई, खोपोली, रायगड या भागाचा सी. एन. एफ. एजंट म्हणून नेमण्याचे आश्वासन दिले. तसेच सदर एजंटशिप दिल्यानंतर त्यांना सात टक्के कमिशन मिळेल, असे सांगून त्यांना 40 लाख रुपये भरण्यास सांगितले. त्यानंतर या दोघांनी इब्राहिमच्या कंपनीसोबत करारनामा करून 15 लाख रोख व पाच लाख रुपये आरटीजीएसद्वारे इब्राहिमला दिले. दुसर्याच दिवशी पॅनासोनिक कंपनीचा सोलरवर चालणारा एसी विकण्यासाठी नवी मुंबईचा डिस्ट्रीब्युटर म्हणून आरव इंटरप्रायझेस यांना नेमण्यात आल्याची जाहिरात प्रसिध्द केली. त्यामुळे या दोघांचा हसीम इब्राहिमवर भरवसा बसल्यानंतर त्यांनी आणखी 15 लाखांची रक्कम आरटीजीएसद्वारे या टोळीला दिली. त्यानंतर इब्राहिमने गोव्याच्या डिरलशिपसाठी आणखी 45 लाख रुपये भरावे लागतील, असे सांगुन त्यांना आणखी 45 लाख रुपये भरण्यास भाग पाडले. त्याबाबतची जाहिरातही त्यांनी प्रसिद्ध केली. त्यानंतर दोघांनी आणखी 25-25 लाखांची रक्कम इब्राहिमला दिली. मामा भाच्याने 85 लाख रुपये दिल्यानंतर हसीम इब्राहिम, इब्राहिम खादर व झिनथ आरीफ मुन्शी यांनी मामा भाच्याला 10 दिवसांत माल पाठविण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर दोघांनी मालासाठी इब्राहिमला फोन लावले असता त्याने फोन घेणे टाळले. काही दिवासांनंतर त्याने आपले दोन्ही फोन नंबर बंद केले. त्यामुळे दोघांनी साकीनाका व मालाड येथील कार्यालयात जाऊन पाहणी केली असता टाळे असल्याचे आढळले. हे कार्यालय खूप दिवसांपासून बंद असून त्यांच्याप्रमाणेच अनेक लोक विचारपूस करण्यासाठी येत असल्याची माहिती मिळाली. दोघांनी सदर त्रिकुटाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र ते कुठेच सापडले नाहीत. त्यानंतर त्यांनी खारघर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.