Breaking News

शरद पवारांविरोधात भाजप युवा मोर्चा मैदानात

जय श्रीराम लिहिलेली 10 लाख पत्रे पाठवणार

पनवेल : प्रतिनिधी, वार्ताहर
अयोध्या येथील प्रभू रामचंद्रांच्या मंदिराचे भूमिपूजन 5 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार असून, या निमित्ताने संपूर्ण देशात उत्साहाचे वातावरण आहे. असे असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मात्र राम मंदिर बांधल्याने कोरोना जाणार का, असे वक्तव्य केल्याने भाजप युवा मोर्चा मैदानात उतरला आहे. पवार यांना प्रभू श्रीरामांची आठवण करून देण्यासाठी जय श्रीराम असे लिहिलेली 10 लाख पत्रे त्यांच्या मुंबईतील सिल्वर ओक या निवासस्थानी राज्यभरातून पाठविण्यात येणार आहेत. या अभियानास बुधवारी (दि. 22) पनवेल येथून प्रारंभ झाला.
याबाबत बोलताना भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील म्हणाले की, देशातील तमाम हिंदू बांधवांच्या श्रद्धेचा विषय असणार्‍या अयोध्या येथील राम मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम येत्या 5 ऑगस्टला होत आहे, मात्र त्याबद्दल शरद पवार यांनी विवादात्मक विधान केले आहे. एवढे मोठे, जाणते आणि सन्माननीय नेते असे विधान चुकून करणे शक्यच नाही. त्यामुळे या विधानामागे कुठेतरी नागरिकांना भ्रमित करण्याचा आणि राजकारण करण्याचा त्यांचा विचार आहे, असा आम्हाला संशय येतो.
प्रभू रामांच्या मंदिर उभारणीबाबत जर कुणी नकारात्मक वातावरण तयार करणार असेल तर भाजप युवा मोर्चा हे सहन करणार नाही. जे जे प्रभू रामांचे नाव विसरतील त्यांना त्याची आठवण करून देण्याचे काम आम्ही करू. त्याच उद्देशाने राज्यभरातून श्रीराम असे लिहिलेली 10 लाख पत्रे शरद पवार यांच्या मुंबई येथील निवासस्थानी आम्ही धाडणार आहोत असे सांगून, शरद पवारांना कोरोना विषाणूचे उच्चाटन होण्यासाठी काय करावे हे ठावूक असेल तर त्याबाबत ते राज्य सरकारला का नाही, असा सवाल विक्रांत पाटील यांनी केला. पुढे बोलताना त्यांनी महाविकास आघाडी कोरोना महामारी रोखण्यात पूर्ण अपयशी ठरली असल्याची टीका करून तीन पायांची शर्यत असणार्‍यांनी महाराष्ट्राला कोव्हिडमध्ये टॉपवर नेल्याचा आरोपही केला.
‘एकही नारा, एकही नाम, जय जय श्री राम!’ अशा घोषणा देत या आंदोलनाची सुरुवात युवकांनी लिहिलेली व नागरिकांकडून जमा केलेली दोन हजार पत्रे नवीन पनवेल येथील पोस्ट ऑफिसमध्ये पोस्ट करून या वेळी करण्यात आला. या अभियानाचा प्रारंभ करताना युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांच्यासह उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, उपाध्यक्ष अमर ठाकूर, सरचिटणीस शेखर तांडेल, दिनेश खानावकर, युवा नेते हॅप्पी सिंग, प्रशांत कदम, समीर कदम, जिल्हा चिटणीस चिन्मय समेळ, खजिनदार भूषण जळे, सदस्य जमीर शेख, कामोठे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, सरचिटणीस नवनाथ भोसले, खारघर आणि तळोजा अध्यक्ष विनोद घरत, सरचिटणीस अमर उपाध्याय, खजिनदार प्रमोद पाटील, पनवेल ग्रामीणचे अध्यक्ष आनंद ढवळे, सरचिटणीस विश्वजित पाटील, कळंबोली अध्यक्ष गोविंद झा, सदस्य अझर शेख, पनवेल शहर अध्यक्ष रोहित जगताप, सरचिटणीस गौरव कांडपिळे आदी पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उत्तर रायगड जिल्ह्यातून 20 हजारांपेक्षा अधिक पत्रे पाठवण्याचा निर्धार या वेळी युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply