दिवंगत लोकनेते दि. बा. पाटील सर्वपक्षीय प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीची मागणी
पनवेल : रामप्रहर वृत्त
उलवे नोडमध्ये कोविड रुग्णालय तातडीने सुरु करण्यात यावे, अशी मागणी माजी खासदार लोकनेते रामशेठ यांच्या नेतृत्वाखाली दिवंगत लोकनेते दि. बा. पाटील सर्वपक्षीय प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करण्यात आली आहे.
समितीतर्फे मुख्यमंत्र्यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, सध्या कोरानाचा प्रसार वेगाने राज्यात आणि देशातही सुरु आहे. सिडको विकसित करीत असलेल्या उलवे नोड, तसेच उरण-पनवेल परिसरात आज कोरोनाचा संसर्ग झपाट्याने सुरू असून नागरिक भयभीत झाले आहेत. येथे वाढत्या लोकसंख्येच्या दृष्टीने आरोग्य यंत्रणा सक्षम नाही. क्वारंटाईन सेंटरही नाही. जिल्ह्यातील रुग्णांची वाट पाहता यंत्रणा हतबल झाली आहे. रुग्णालयांत जागा शिल्लक नाहीत. अनेक नागरिक उपचाराअभावी घरीच आहेत, तसेच खासगी दवाखान्यात लुटमार सुरू असल्याच्या बातम्या प्रसिद्ध होत आहेत. त्यामुळे उलवा नोड, उरण, पनवेलतील नागरिकांना तातडीने कोविड रुग्णालयाची गरज आहे. तसेच त्या हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटर बेड (आयसीयू) उभारण्याची गरज आहे, जेणेकरून अत्यवस्थ रुग्णाला तिथल्या तिथे उपचार मिळतील आणि त्याचा जीव वाचेल. सेक्टर 7 येथे विना रहिवासी क्षेत्रात रिलायन्सच्या दोन तयार अद्ययावत असे व्यावसायिक संकुल व सेक्टर 24 उलवे नोडमधील सिडकोने बांधलेली रायगड जिल्हा परिषदेची उलवे तरघर-कोंबडभुजे शाळेचा शासनाने सर्व्हे करुन शक्य असल्यास तेथे 200 बेड्सचे तात्पुरत्या स्वरूपाचे कोव्हीड हॉस्पिटल उभारण्यात यावे. रोटरी क्लब ऑफ उलवे नोडच्या डॉक्टर्स प्रतिनिधींनी जर या सुविधा उपलब्ध करून दिल्यास त्यांनी स्वतः व बाकी लागणारा स्टाफ उपलब्ध करून शासन तत्वावर हे सेंटर उभारण्यासाठी पूर्णतः सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. सिडकोने मुलुंड येथे 2000 बेड्सचे व ठाणे येथे 1600 बेड्सचे अद्ययावत असे तात्पुरत्या स्वरूपाचे कोविड रुग्णालय उभारले आहेत. त्याच पद्धतीने नवी मुंबई, उलवे नोड, उरण व पनवेल परिसरात हे कोविड हॉस्पिटल उभारण्यात यावे, असेही या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.