Breaking News

अँटीजेन चाचणी सेंटर सुरू करण्याची भाजपची मागणी

कोरोना नियंत्रणासाठी संजय भोपी यांचे पमपाकडे निवेदन

पनवेल : रामप्रहर वृत्त

पनवेल महानगरपालिकेचा प्रभाग समिती ‘ब’च्या हद्दीत कोरोना नियंत्रणासाठी अँटीजेन चाचणी सेंटर सुरु करा. त्या ठिकाणी कळंबोली, खांदा वसाहत आणि नवीन पनवेल परिसरातील नागरिकांच्या अशा प्रकारच्या चाचण्या करण्यात याव्यात, अशी मागणी प्रभाग समिती ‘ब’चे सभापती संजय भोपी यांनी मनपा आयुक्तांकडे केली आहे. याबाबत प्रशासन सकारात्मक भूमिका घेईल, असे मत भोपी यांनी व्यक्त केले.

वार्‍याच्या वेगाने कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होतेय. त्यामुळे सर्वाधिक रुग्ण आढळेल्या विभागात रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यात येतंय. या चाचणीसाठी रुग्णाच्या रक्ताचे नमुने घेतले जातात. या रक्ताच्या नमुन्यातून 15 ते 20 मिनिटांत शरीरात कोणते विषाणू आहेत याचा तपास लागतो. संशयिताच्या शरीरात कोरोनाविरोधात लढण्यासाठी अ‍ॅन्टिबॉडी काम करतेय की नाही, हे या चाचणीतून तापसले जाते. लक्षणे नसलेल्या लोकांसाठी रॅपिड टेस्टिंग वरदान ठरतेय. रुग्णाच्या शरीरात अ‍ॅन्टिबॉडी कार्यरत नसेल तर त्या व्यक्तीला कोरोनाची लागण होण्याची शक्यता असते. रॅपिड अँटीजेन टेस्टिंगमार्फत या रुग्णांची माहिती मिळते. मुख्यत: ज्यांना कोरोनाची लक्षणे दिसतात त्यांच्या घशातील स्वॅब घेऊन चाचणी करण्यात येते, त्यामुळे त्यांना कोरोनाची बाधा झाली आहे की नाही याची माहिती मिळते. मात्र ज्यांना लक्षणे दिसत नाहीत, त्यांना कोरोनाची बाधा झाली आहे की नाही हे तपासण्याची रॅपिड अँटीजेन टेस्टिंगचा वापर केला जातो. ही चाचणी कमी वेळात आणि खर्चात केली जाते. त्याला आयसीएमआरने मान्यता दिली आहे.

सध्याची परिस्थिती पाहता पनवेल महानगरपालिका प्रभाग समिती ‘ब’ मधील नागरीकांना कोरोनाच्या चाचणीसाठी पनवेल उपजिल्हा रूग्णालय अथवा इंडिया बुल्स येथे जावे लागत आहे. अहवाल प्राप्त होण्यास दोन ते तीन दिवसांचा कालावधी लागतो. यादरम्यान संशयित रूग्णामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका नाकारता येत नाही. पनवेल महानगरपालिकेच्या वतीने खारघर येथील आरोग्य केंद्रात रॅपिड अँटीजेन चाचणीस सुरूवात केली आहे. याकरता केंद्र सुद्धा सुरू करण्यात आले आहेत. स्थानिक नागरीकांकडून या सुविधा आणि उपाय योजनेबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले आहे. याच धर्तीवर प्रभाग समिती ब हद्दीत  रॅपिड अँटीजेन चाचणी सुविधा प्रभागात सुरू करण्यात यावी अशी मागणी सभापती संजय भोपी यांनी केली आहे. याबाबत महापालिका आयुक्तांना निवेदन देण्यात आले आहे.

रॅपिड अँटीजेन चाचणीद्वारे तपासणी केल्यानंतर अवघ्या अर्ध्या तासात अहवाल प्राप्त होतो. कोरोनाबाबतचे निदान योग्य वेळेत झाल्यामुळे संबंधित बाधित रुग्णावर तत्काळ आवश्यक उपचार करून कोरोनाचा वाढता संसर्ग टाळता येणे शक्य आहे. कोरोना विरूद्धच्या लढ्यासाठी रॅपिड अँटीजेन चाचणी हे प्रभावी शस्त्र हातात घेऊन या माध्यमातून कोरोनाला पूर्णपणे हद्दपार करण्यासाठी राज्यातील सर्वच प्रशासकीय यंत्रणानी कंबर कसली आहे. सध्याची परिस्थिती पाहता पनवेल महानगरपालिका प्रभाग समिती ‘ब’मध्ये अशाप्रकारे आपल्या करण्यासाठी सेंटर सुरू करावेत अशी मागणी आम्ही केली आहे.

-संजय भोपी, सभापती, प्रभाग समिती ‘ब’, पमपा

नवी मुंबईत पोलिसांच्या अँटीजेन टेस्टला सुरुवात

नवी मुंबई : बातमीदार

नवी मुंबई पोलीस आयुक्तालयांतर्गत असलेल्या तब्बल साडेचार हजार पोलिसांची कोविड टेस्ट केली जाणार असून एक तासात रिपोर्ट मिळणार्‍या अँटीजेन टेस्टला सुरुवात देखील झाली आहे. थेट नागरिकांच्या संपर्कात येऊन स्वतःचे आयुष्य धोक्यात घालून शहराची रखवाली करणार्‍या पोलिसांसाठी ही दिलसादायक बाब असून पोलीस आयुक्त संजय कुमार यांनी नवी मुंबई पालिकेच्या माध्यमातून हे पाऊल उचलले आहे.

नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाची हद्द ही नवी मुंबई, पनवेल, उरणपर्यंत पसरलेली आहे. पोलीस दलात चार हजार पाचशे पोलीस अधिकारी, कर्मचारी कार्यरत आहेत. सध्या पनवेल व उरण पोलीस ठाण्यात अँटीजेंन टेस्ट पूर्ण करण्यात आल्या आहेत. सीबीडी बेलापूर हेड कोर्टर व क्राईम ब्रँचमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. या दोन्ही ठिकाणी संपूर्ण कर्मचार्‍यांच्या अँटीजेन टेस्ट केल्या जात आहेत.

नेरुळ डॉ. डी वाय पाटील रूग्णालयाशेजारी पोलिसांसाठी सावली  केंद्र उभारण्यात आले आहे. तिथे 40 बेडची व्यवस्था बधितांसाठी करण्यात आली आहे. तर कळंबोली पोलीस निवारा केंद्रात 70 बेडची व्यवस्था पोलिसांसाठी करण्यात आली आहे. साडेचार हजार स्टाफ असला तरी ज्यांच्या टेस्ट झाल्या आहेत त्या वगळून टेस्ट केल्या जाणार आहेत. सध्या बेलापूर येथील नवी मुंबई पोलिसांच्या मुख्यालयात सॅनिटायजर टनल बसवण्यात आले आहे. यातून पोलिसांचे सॅनिटायजेशन होणार आहे. तर सॅनिटायजर व्हॅन तयार करण्यात आली आहे. त्यात गस्तीवरील पोलिसांनी सॅनिटाईज करून मगच ड्युटीवर जायचे आहे. मात्र असे असले तरी या सॅनिटायजरचा परिणाम किती वेळ राहतो? 12  तास ड्युटी करणार्‍या पोलिसांना हे सॅनिटायजेशन संपूर्ण दिवस परिणामकारक ठरू शकेल का? असे अनेक प्रश्न विचारले जात आहेत.

टप्याटप्प्याने संपूर्ण कर्मचार्‍यांच्या टेस्ट केल्या जाणार असून त्यामुळे साखळी तोडण्यात यश येऊन पोलिसांवर वेळीच उपचार केले जातील. तसेच सावली व निवारा केंद्रात बेड देखील वाढवण्यात आले आहेत.सध्या सुरू असलेल्या लॉकडाऊनमध्ये नवी मुंबई व पनवेल व उरणमधील नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे.

-संजय कुमार, आयुक्त, नवी मुंबई पोलीस

Check Also

पनवेल विधानसभा क्षेत्रात नमो चषक 2025 भव्य क्रीडा महोत्सव

खारघरमध्ये भव्य क्रिकेट, कळंबोलीत कुस्ती, तर कामोठ्यात व्हॉलीबॉल, रस्सीखेच आणि फुटबॉल स्पर्धा पनवेल : रामप्रहर …

Leave a Reply