खोपोली : प्रतिनिधी – अष्टविनायकापैकी एक असलेल्या खालापूर तालुक्यातील महड येथील वरदविनायकाचे मंदिर आहे. येथील मुख्य कमानीपासून मंदिरापर्यंतचे पथदिवे बंद आहेत.
मंदिराच्या परिसरात मुख्य रस्त्यावर स्वागत कमान आहे. तिथूनच पथदिवे लावण्यात आलेले असून, सद्यस्थितीत ते बंद आहेत. महड हे खालापूर नगरपंचायत हद्दीत असल्याने मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध असणे महत्त्वाचे आहे, मात्र पथदिवे बंद असल्याने काळोखातून महड गावामध्ये यावे लागत आहे. अशा या धार्मिक पर्यटनस्थळी पथदिवे आवश्यक आहे, पण काही ठिकाणी पथदिव्यांची दुरुस्ती केली गेली नाही तसेच नवीन पथदिवे लावण्यासाठी विद्युत पोल उभे केल्याचे दिसत आहे.
वास्तविक पाहता महड तीर्थक्षेत्राला ब दर्जा आहे. येथील पथदिवे हे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 येथूनच मंदिरापर्यंत असावेत, अशी अपेक्षा भक्तांची आहे. मंदिर व्यवस्थापनाने यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी होत आहे.