आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागणीला यश
पनवेल : प्रतिनिधी
पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील लॉकडाऊन हटविण्यासंदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागणीला यश आले आहे. क्लस्टर कंटेन्मेंट झोन व कंटेन्मेंट झोन वगळून लॉकडाऊन संपुष्टात आणण्याचे आदेश मनपा आयुक्त सुधाकर देशमुख यांनी जारी केले आहेत.
पनवेल महापालिका क्षेत्रातील लॉकडाऊन हटवून जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी तातडीने पावले उचलावीत, अशी आग्रही मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती तसेच भाजपच्या वतीने आंदोलनात्मक भूमिका जाहीर केली होती. या अनुषंगाने क्लस्टर कंटेन्मेंट झोन व कंटेन्मेंट झोन वगळून इतर ठिकाणी असलेला लॉकडाऊन उठवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी बुधवारी (दि. 22) सकाळी 5 वाजल्यापासून होणार असून, सम-विषम तारखेला ’मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत दुकाने अटी-शर्थींवर उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे.
कोरोना प्रसार थांबविण्यासाठी आधी 3 जुलै ते 14 जुलैपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. यामध्ये अत्यावश्यक सेवा पुरविणार्या दुकानांवर निर्बंध घालण्यात आले होते. दरम्यान, जिल्ह्यात लॉकडाऊन घोषित झाल्यानंतर पनवेलमधील लॉकडाऊनही 24 जुलै रात्री 12 वाजेपर्यंत वाढविण्यात आला. या पार्श्वभूमीवर आमदार प्रशांत ठाकूर यांनी जनसामान्यांचा विचार करून पनवेल महापालिका हद्दीतील लॉकडाऊन हटविण्याची मागणी आयुक्तांकडे केली होती. यानंतर महापालिकेच्या वतीने लॉकडाऊन शिथिल करण्यात आला होता, पण त्याचा फायदा सर्वसामान्य नागरिकांना होत नव्हता. त्यामुळे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली भाजपची आक्रमक भूमिका कायम होती. अखेर आयुक्तांनी 22 जुलैपासून लॉकडाऊन उठविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
आमदार प्रशांत ठाकूर यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे, पण पूर्णपणे लॉकडाऊन उठत नाही आणि जनजीवन पूर्ववत होत नाही तोपर्यंत समाधानी नसल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्याचबरोबर लॉकडाऊन उठल्यानंतर नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंगचे कटाक्षाने पालन करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
‘मिशन बिगीन अगेन’
पनवेल मनपा हद्दीतील लॉकडाऊन उठविण्याचे आदेश 22 जुलै सकाळी 5 वाजल्यापासून 31 जुलै मध्यरात्री 12 वाजेपर्यंत लागू असतील. कंटेन्मेंट क्षेत्राव्यतिरिक्त अन्यत्र ‘मिशन बिगीन अगेन’ची कार्यवाही होणार आहे. यात मॉल्स, मार्केट व कॉम्प्लेक्स वगळता सर्व भाजी मार्केटसह बाजारपेठा आणि दुकाने सम-विषम तत्त्वावर सकाळी 9 ते संध्याकाळी 5 या वेळेत उघडी ठेवण्यास परवानगी असेल. एपीएमसी मार्केट व मच्छी मार्केट मात्र बंदच राहणार आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper