चार पराभवानंतर साकारला विजय
अहमदाबाद ः वृत्तसंस्था
येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या आयपीएलच्या साखळी सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सने पंजाब किंग्जवर पाच गडी राखून विजय मिळवला. कोलकाताने आधी भेदक गोलंदाजी करून पंजाबला 20 षटकांत नऊ बाद 123 धावांमध्ये रोखले. त्यानंतर 17व्या षटकात विजय मिळवला. कोलकाताचा कर्णधार ईऑन मॉर्गनला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.
पंजाबच्या छोट्या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकाताची सुरुवात खराब झाली. पहिल्याच षटकात मोझेस हेन्रिक्सने नितीश राणाला शून्यावर बाद केले. पुढच्याच षटकात वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने शुबमन गिलला पायचित पकडले. गिल पुन्हा अपयशी ठरला. त्याने नऊ धावा केल्या. मैदानात आलेला सुनील नरिन तिसर्या षटकात माघारी परतला. अर्शदीप सिंगच्या गोलंदाजीवर त्याच्या रवी बिश्नोईने सुंदर झेल टिपला. नरिनला भोपळाही फोडता आला नाही. त्यानंतर कर्णधार ईऑन मॉर्गन आणि राहुल त्रिपाठीने संघाला सावरले. अर्धशतकाकडे वाटचाल करणार्या त्रिपाठीला दीपक हुडाने माघारी धाडले. त्रिपाठीने सात चौकरांसह 41 धावा केल्या. त्यानंतर मैदानात आलेला आंद्रे रसेलही अपयशी ठरला. 15व्या षटकात तो धावबाद झाला. रसेलला 10 धावा करता आल्या. रसेलनंतर मैदानात आलेल्या दिनेश कार्तिकने विजयावर शिक्कामोर्तब केले. चार पराभवानंतर कोलकाताने हा विजय साकारला आहे.
तत्पूर्वी, पंजाबकडून कर्णधार के. एल. राहुल आणि मयंक अग्रवाल यांनी डावाची सुरुवात केली. पाच षटकांत पंजाबने 29 धावा फलकावर लावल्या. पॉवरप्लेच्या शेवटच्या षटकात राहुल माघारी परतला. त्याला पॅट कमिन्सने झेलबाद केले. राहुलला 19 धावा करता आल्या. राहुलनंतर आलेले ख्रिस गेल आणि दीपक हुडा हे दोघेही मोठी खेळी करण्यात अपयशी ठरले. शिवम मावीने गेलला शून्यावर, तर प्रसिध कृष्णाने हुडाला एका धावेवर माघारी धाडले. त्यानंतर मयंक आणि निकोलस पूरन यांनी पंजाबचे अर्धशतक पूर्ण केले. खेळपट्टीवर स्थिरावलेल्या मयंकला नरिनने राहुल त्रिपाठीकरवी झेलबाद केले. मयंकने 31 धावांचे योगदान दिले. मयंकनंतर आलेला मोझेस हेन्रिक्सही काही खास करू शकला नाही. नरिनचा तो दुसरा बळी ठरला.
वरुण चक्रवर्तीने 15व्या षटकात पंजाबला अजून एक धक्का दिला. त्याने निकोलस पूरनची 19 धावांवर दांडी गुल केली. शंभर धावांच्या आत पंजाबने शाहरूख खानलाही गमावले. प्रसिध कृष्णाने शाहरूखला वैयक्तिक 13 धावांवर बाद केले. शेवटच्या षटकात ख्रिस जॉर्डनने केलेल्या फटकेबाजीमुळे पंजाबला 120 धावा ओलांडता आल्या. जॉर्डनने 18 चेंडूंत एक चौकार आणि तीन षटकारांसह 30 धावा केल्या. कोलकाताकडून प्रसिध कृष्णाने सर्वाधिक तीन बळी घेतले. सुनील नरिन आणि कमिन्सला प्रत्येकी दोन बळी मिळाले.