बॉलिवुड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या कथित आत्महत्येला महिनाभराहून अधिक काळ लोटला आहे. या काळात त्याच्या मृत्यूसंदर्भात अनेक उलटसुलट दावे-प्रतिदावे केले गेले असून तपासाचे गुर्हाळ सुरुच आहे. या प्रकरणी 36 जणांचे जाब-जबाब नोंदवण्यात आल्याचे स्वत: गृहमंत्र्यांनी रविवारी सांगितले. मात्र अद्यापही या प्रकरणी ठोस अशी कोणतीही माहिती पुढे आलेली नाही. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सीबीआय चौकशीची गरज नाही असा स्पष्ट निर्वाळा दिलेला असताना त्यांच्याच पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांनी सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. आता तरी ठाकरे सरकार या रास्त मागणीवर सकारात्मक विचार करेल अशी अपेक्षा आहे.
बॉलिवुड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने त्याच्या वांद्रे येथील निवासस्थानी 14 जून रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली. अवघ्या 34 वर्षाच्या आणि अभिनय क्षेत्रातील कारकीर्द अतिशय यशस्वीरित्या उभी रहात असलेल्या या अभिनेत्याने हे टोकाचे पाऊल का उचलले असावे याविषयी बॉलिवुडमधील अनेक नामवंतांनी दावे-प्रतिदावे केले आहेत. अभिनेत्री कंगना राणावत, दिग्दर्शक अनुराग कश्यप तसेच दिग्दर्शक शेखर कपूर आदींनी सुशांतच्या मृत्यूमागे बॉलिवुडमधील कंपूशाही तसेच घराणेशाही असल्याचे सूचित केल्याने निर्माता-दिग्दर्शक करण जोहर, आघाडीची अभिनेत्री आलिया भट आदींना समाजमाध्यमांवर चाहत्यांच्या रोषालाही तोंड द्यावे लागले. बॉलिवुडमधील एका विशिष्ट कंपूकडून सुशांत सिंहचा वेळोवेळी अपमान करण्यात आल्याचे पुरावे दर्शवणारे व्हिडिओ समाजमाध्यमांवर फिरू लागले. सुशांतची व्यावसायिक कोंडी करण्यात येऊन गेले काही महिने त्याला पूर्णत: एकटे पाडण्यात आले होते आदी चर्चांना उधाण आले. गेला महिना-सव्वा महिना नामवंत दिग्दर्शक संजय लीला भन्साळीपासून महेश भट यांच्यापर्यंत अनेकांचे जाब-जबाब पोलिसांनी नोंदवले आहेत. सुशांत सिंह हा मृत्यूपूर्वी काही काळ नैराश्यावरील उपचार घेत होता अशीही माहिती पुढे आली व त्यासंदर्भात पोलिसांनी सुशांतच्या मनोविकार तज्ज्ञांनादेखील चौकशीसाठी बोलावले. सुशांतचा मृत्यू वैयक्तिक कारणांतून झाला असण्याची शक्यता तपासून पहाण्याकरता त्याची अलिकडच्या काळातील जवळची मैत्रिण रिया चक्रवर्ती हिची देखील पोलिसांनी चौकशी केली. मात्र या संपूर्ण काळात सुशांतच्या मृत्यूमागे व्यावसायिक षडयंत्र असल्याच्या चर्चेला काही पूर्णविराम मिळाला नाही. सुशांतने बॉलिवुडमध्ये जे सोसले ते या झगमगत्या मायावी दुनियेत बाहेरच्या सर्वसामान्य जगातून येऊन आपले स्थान निर्मांण करु पाहणार्या प्रत्येक नवोदिताला सोसावे लागते. त्यामुळेच या प्रकरणाबद्दल विशेषत: तरुणांच्या भावना तीव्र आहेत. सुशांतच्या मृत्यूनंतर तरी बॉलिवुडमधील संबंधित परिस्थितीत काही बदल व्हावा याकरता याप्रकरणाची सखोल आणि नि:पक्षपाती चौकशी होण्याची गरज आहे अशी मागणी समाजमाध्यमांवर चित्रपट क्षेत्राशी संबंधित अनेकांकडून तसेच त्याच्या चाहत्यांकडून वारंवार केली गेली आहे. भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून याप्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली होती. सुशांतची मैत्रिण रिया हिनेही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडेही सीबीआय चौकशीची मागणी केली होती. परंतु राज्याच्या गृहमंत्र्यांनी मात्र सीबीआय चौकशीची गरज नसल्याचा निर्वाळा आठवडाभरापूर्वी स्पष्ट शब्दात दिला होता. आता त्यांच्याच पक्षाचे अजितदादा पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांनी याप्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.