आजपासून लगबग वाढणार; ग्राहकांच्या सुरक्षेसाठी विविध उपाययोजना
पनवेल ः बातमीदार
मिशन बिगिन अगेन अंतर्गत बुधवारपासून (दि. 5) शहरातील मॉल्स सुरू होणार आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा जवळजवळ साडेचार महिन्यांनंतर मॉल्सचे शहर असलेल्या नवी मुंबईतील लगबग वाढणार असून, मॉल्स व्यवस्थापनानेही सामाजिक अंतराचे नियम पाळण्याबरोबरच ग्राहकांच्या आरोग्याची खबरदारी घेण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शहरातील मॉल्स व इतर व्यवहार मार्चच्या मध्यापासून ठप्प झाले होते. कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता संपूर्ण देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिली टाळेबंदी घोषित केली. त्यानंतर टप्प्याटप्प्याने ती पुढे वाढत गेली. त्यामुळे लाखोंचे रोजगार गेले, तर व्यापार धोक्यात आला. केंद्र आणि राज्य सरकारच्या मिशन बिगिन अगेन अंतर्गत टप्प्याटप्प्याने पुन्हा व्यवहार हळूहळू सुरू करण्यात आले आहेत. बुधवारपासून मॉल्स सुरू करण्यात येत आहेत. सीवूड्स रेल्वेस्थानक परिसरात असलेला ग्रॅन्ड सेन्ट्रल मॉल, वाशी येथील रघुलीला, इनॉॅर्बिट तसेच विविध मॉल्समुळे शहरात मॉलकडे नागरिक मोठ्या प्रमाणात आकर्षित झाले आहेत, तर अनेकांना विंडो शॉपिंगची मजा घेता येते.
त्यामुळे नागरिकांमध्येही विशेषतः युवावर्गात मॉल्स कधी सुरू होणार याबाबत उत्सुकता होती. मॉल्स सुरू झाल्यानंतर मात्र तेथे होणारी गर्दी पाहता अंतराच्या नियमांचा फज्जा उडू नये यासाठी मॉल्स व्यवस्थापनानेही विविध उपाययोजना केल्याचे निदर्शनास आले आहे. सीवूड्स ग्रॅन्ड सेन्ट्रल मॉल येथेही विविध उपाययोजना करण्यात आल्या असून मॉलमधील प्रवेशद्वारापासून ते ग्राहक बाहेर पडेपर्यंत सोशल डिस्टन्सिंग राखण्याबाबतची खबरदारी घेण्यात आल्याचे दिसत आहे. प्रवेशद्वारावर जंतुनाशकाची व्यवस्था तसेच प्रवेश करणार्या प्रत्येकाची थर्मल स्क्रिनिंगद्वारे तपासणी, लिफ्टमध्ये चौघांनाच प्रवेश, प्रसाधनगृह तसेच वाहनतळ व्यवस्था असेल.
बुधवारपासून मॉल सुरू करण्यात येणार असल्याने मॉलमध्ये संपूर्ण निर्जंतुकीकरण करून विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. अंतराच्या नियमासाठी व्यवस्थापनाने योग्य खबरदारी घेतली आहे. नागरिकांनीही यासाठी सहकार्य करावे. मॉलमधील दुकाने सकाळी 11 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत आणि बिग बझार सकाळी 10 ते 7 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येतील.
-अनिष नायर, मॉल व्यवस्थापन, सीवूड्स ग्रॅन्ड सेन्ट्रल मॉल
वाशीतील रघुलीला मॉलमध्येही योग्य ते नियम पाळून व्यवहार सुरू करण्यात येत आहेत. नागरिकांनीही योग्य ते सहकार्य करावे. सर्व ग्राहकांनी अंतराच्या नियमांचे कोटेकोरपणे पालन करावे. सकाळी 9 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत मॉल सुरू ठेवण्यात येणार आहे.
-संदीप देशमुख, रघुलीला मॉल व्यवस्थापन, वाशी