Breaking News

महाड शहरातील कोविड सेंटर सुरू करा; भाजप मागणीवर ठाम

महाड : प्रतिनिधी

महाड औद्योगिक क्षेत्रातील एमएमए कोविड सेंटर अद्ययावत करा, पण त्याचबरोबर शहरातील ट्रामा केअर सेंटरमधील कोविड सेंटर पुन्हा सुरू करण्याची मागणी भाजपने मंगळवारी (दि. 18) पत्रकार परिषदेत केली. उपचार होऊ न शकल्याने अशोक सावंत यांच्या मृत्यूला जबाबदार कोण, असा सवाल भाजपचे जिल्हा सरचिटणीस बिपीन महामुणकर यांनी या वेळी केला, तर राज्य सरकार कुचकामी असल्याचा आरोप तालुकाध्यक्ष जयवंत दळवी यांनी केला.प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर्सना सक्तीने महाड एमआयडीसीतील एमएमए कोविड सेंटरमध्ये कार्यरत केल्याने ग्रामीण आरोग्य यंत्रणा कोलमडणार आहे. हे कोविड सेंटर शहरापासून लांब असून, तेथे जाणे-येणे सोयीचे नाही. गोळ्या-औषधांसाठी रुग्णांच्या नातेवाइकांची फरपट होत आहे. ते पाहता पूर्वीचे ट्रामा केअर सेंटरमधील कोविड सेंटर सुरू ठेवावे. या प्रश्नी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या माध्यमातून वाचा फोडण्यात येईल, असे बिपीन महामुणकर यांनी सांगितले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोठा गाजावाजा करीत उद्घाटन केलेल्या महाड एमआयडीसीतील एमएमए कोविड सेंटरमध्ये एमडी डॉक्टर्स, नर्सेस आणि पॅरामेडिकल स्टाफ नाही. मग या कोविड सेंटरचा उपयोग काय, असा प्रश्न जयवंत दळवी यांनी केला. पत्रकार परिषदेला भाजप जिल्हा कार्यकारिणी सदस्य संदीप ठोंबरे, लोकसभा मीडिया सहसंपर्कप्रमुख महेश शिंदे, उपतालुकाध्यक्ष चंद्रजित पालांडे, युवा संघटनेचे विशाल गायकवाड हेही उपस्थित होते.

Check Also

रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये प्रदर्शन; रोबोट आकर्षण

खारघर ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये …

Leave a Reply