Breaking News

वादळग्रस्तांना तातडीने मदत वाटप करा; भाजपचे निवेदन

अलिबाग : प्रतिनिधी

निसर्ग चक्रीवादळग्रस्तांना मदतीचे तातडीने वाटप करा, अशी मागणी अलिबाग तालुका भारतीय जनता पक्षाने तहसीलदारांकडे केली आहे. या संदर्भात निवेदन देण्यात आले. भाजप शिष्टमंडळाने मंगळवारी (दि. 18) अलिबागचे तहसीलदार सचिन शेजाळ यांची भेट घेऊन चर्चा केली व निसर्ग चक्रीवादळात नुकसान झालेल्यांना तातडीने मदत द्यावी, अशी मागणी केली. भाजप अलिबाग तालुका अध्यक्ष परशुराम म्हात्रे, पंचायत समिती सदस्य उदय काठे, अलिबाग शहर अध्यक्ष अ‍ॅड. अंकित बंगेरा, कुर्डूसचे सरपंच अनंत पाटील, जिल्हा उपाध्यक्ष हेमंत दांडेकर आदींचा शिष्टमंडळात समावेश होता. निसर्ग चक्रीवादळात अलिबाग तालुक्यातील रेवदंडा, चौल, नागाव, आक्षी, थळ, आवास, मांडव या तसेच किनारपट्टीवरील इतर गावांमध्ये बागायतदारांचे प्रचंड नुकसान झाले. या बागायतदारांना अद्याप नुकसानभरपाई देण्यात आली नाही. रामराज, कुर्डूस, शहापूर, बेलोशी, आंबेपूर, मानकुळे, शहाबाज येथे घरांचे नुकसान झाले आहे. त्यातील काही लोकांना अजून नुकसानभरपाई मिळालेली नाही. नुकसानग्रस्त बागायतदार व घरमालकांना ताबडतोब नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी भाजप शिष्टमंडळाने केली आहे. जर मदतीचे वाटप लवकर केले नाही, तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारादेखील या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. चक्रीवादळाचा जोरदार तडाखा बसलेल्या रायगडकरांची शासन आणि प्रशासनाने सुरुवातीपासूनच चेष्टा चालविली आहे. कधी पंचनामे केले नाही, कधी मदत पोहचवली नाही. साधा झाडापाल्याचा कचराही काही ठिकाणी वादळग्रस्त नागरिकांना उचलायला लागला. वादळ होऊन अडीच महिने उलटून गेले तरी सर्व आपद्ग्रस्तांना अद्याप मदत मिळालेली नाही. त्यामुळे जनभावना तीव्र होत चालल्या आहेत. जनतेसाठी भाजप धावून आला असून, चक्रीवादळग्रस्तांचा आवाज शासनदरबारी पोहचविला जात आहे.

Check Also

डिस्टन्स इलेव्हनने पटकावले नमो चषक व्हॉलीबॉल विजेतेपद

पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता युवा मोर्चा पनवेलच्या वतीने भव्य क्रीडा महोत्सव अर्थात नमो चषक …

Leave a Reply