मुंबई : प्रतिनिधी
पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपच्या तिकिटावर निवडून आलेले खासदार राजेंद्र गावित यांनी मंगळवारी (दि. 26) शिवसेनेत प्रवेश केला. गावित यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर त्यांना पालघरमधून लोकसभेचे तिकीट देण्यात आले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ही घोषणा केली.
शिवसेना-भाजपची युती झाल्यानंतर पालघरची जागा शिवसेनेच्या वाट्याला आली होती. त्यामुळे राजेंद्र गावित यांनी मंगळवारी मातोश्री निवासस्थानी जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला. या वेळी श्रीनिवास वनगाही उपस्थित होते.
खासदारकीची प्रत्येक जागा जिंकणे महत्त्वाचे होते. त्यातच श्रीनिवासने विधानसभा लढवण्याची इच्छा व्यक्त केल्याने गावित यांना पक्षात प्रवेश देऊन त्यांना उमेदवारी देण्यात आली. जागावाटपात जागा मिळाली आणि उमेदवारही मिळाल्याचे पहिल्यांदाच घडले असेल, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. श्रीनिवासला आमदार व्हायचे आहे. त्यामुळे त्याला कोणत्याही परिस्थिती विधानसभेत पाठवण्यात येईल, असेही ठाकरे यांनी स्पष्ट केले.