Breaking News

सप्टेंबर ‘पोषण महिना’ म्हणून साजरा होणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (दि. 30) ‘मन की बात’ या कार्यक्रमाद्वारे देशवासीयांशी संवाद साधला. या वेळी त्यांनी संपूर्ण सप्टेंबर महिना देशभरात पोषण महिना म्हणून साजरा केला जाईल, असे जाहीर केले. पोषणाचा अर्थ असा नाही की आपण काय खातो, किती खातो, किती वेळा खातो. पोषणाचा खरा अर्थ म्हणजे आपल्या शरीराला किती आवश्यक पोषक आहार मिळतो हा आहे. आपल्यात एक म्हण आहे ‘यथा अन्नम तथा मन्नम’ म्हणजेच जसे आपले अन्न असते त्याप्रमाणे आपला मानसिक व बौद्धिक विकास होतो. त्यामुळे पोषक आहाराला खूप महत्त्व असते, असे पंतप्रधान मोदींनी सांगितले.पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, भारतीय कृषिकोष तयार करण्यात येणार आहे. यामध्ये देशातील प्रत्येक जिल्ह्यात कोणते धान्य पिकते, त्याची पोषणमूल्ये किती याबाबत सर्व माहिती दिली जाणार आहे. या वेळी पंतप्रधानांनी देशभरातील शेतकर्‍यांना नमन केले. शेतकर्‍यांच्या कष्टांमुळेच आपल्या सण-उत्सवांमध्ये रंग भरले जातात. आपल्या अन्नदात्यास शेतकर्‍यांच्या या शक्तीस वेदांमध्येही नमन करण्यात आले आहे. कोरोना संकट काळात देशातील शेतकर्‍यांनी आपले सामर्थ्य सिद्ध केले आहे. यासाठी देशातील शेतकर्‍यांचे मी अभिनंदन करतो. त्यांच्या कष्टांना नमन करतो, अशा शब्दांत त्यांनी भावना व्यक्त केल्या.पंतप्रधान मोदींनी आपल्या संबोधनात खेळणी उद्योगावर भाष्य करीत भारताला खेळणी उद्योगातील प्रमुख ठिकाण बनवण्यासाठी सर्वांनी एकत्र येत प्रयत्न करण्याचे आवाहन केले तसेच आता सर्वांनी खेळणींसाठी व्होकल होण्याची वेळ आली असल्याचेही ते म्हणाले.

Check Also

कामोठ्यात आमदार आपल्या दारी!

उपक्रमाचे नागरिकांनी स्वागत करत व्यक्त केले समाधान पनवेल : रामप्रहर वृत्तकामोठे वसाहतीत आमदार प्रशांत ठाकूर …

Leave a Reply