Breaking News

महाराष्ट्रात कोरोनाची स्थिती गंभीर; ग्रामीण भागातही होतोय वेगाने प्रसार

मुंबई : प्रतिनिधी

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या गेला आठवडाभर सातत्याने वाढत असून, रविवारी (दि. 30) सकाळी संपलेल्या 24 तासांमध्ये राज्यात 17 हजारांहून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. राज्याच्या दृष्टीने चिंताजनक गोष्ट म्हणजे याआधी शहरी भागापुरता मर्यादित असलेला कोरोना आता ग्रामीण भागातही झपाट्याने पसरू लागला आहे. कोरोनाच्या रुग्णांचा विचार करता मुंबई, ठाणे व पुणे जिल्हा वरच्या स्थानी कायम असला तरी आता कोल्हापूर, सोलापूर, जळगाव, अहमदनगर, लातूर, उस्मानाबाद व अमरावती जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढू लागली आहे. त्याचबरोबर चंद्रपूर, यवतमाळ व धुळे जिल्ह्यातही कोरोनाचे रुग्ण वाढताना दिसत आहेत. राज्यात शनिवारी तब्बल 16 हजार 867 रुग्ण आढळून आले असून, यामध्ये मुंबईतील 1432, पालघरसह ठाणे जिल्ह्यातील 3805, पुणे मंडळातील 5292, कोल्हापूर 1294, नाशिक 2938, तर नागपूर मंडळातील 1775 रुग्णांचा समावेश आहे. गडचिरोलीत कोरोना रुग्णांची संख्या 708 एवढी झाली आहे, तर जळगाव, सातारा, कोल्हापूर शहर आदी ठिकाणी साडेतीनशे ते सातशे रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनाची साथ महाराष्ट्रात आली त्याला आता 174 दिवस झाले असून, राज्यात कोरोना रुग्णांची संख्या सात लाख 50 हजार एवढी झाली आहे. यातील पाच लाख 54 हजार रुग्ण बरे झाले असून, हे प्रमाण 72.58 टक्के एवढे असले तरी आजही 1,85,131 एवढे अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. गेल्या आठवडाभरात रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असून, गेल्या आठवड्याच्या सुरुवातीला सुमारे 14 हजार असलेली कोरोना रुग्णांची संख्या तीन हजारांनी वाढून आता 17 हजारांवर पोहचली आहे. यातील गंभीर बाब म्हणजे शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातही कोरोना वेगाने पसरू पाहत आहे.

रायगडात 514 नवे; रुग्ण; आठ जणांचा मृत्यू

पनवेल : रामप्रहर वृत्त

रायगड जिल्ह्यात रविवारी (दि. 30) 514 नव्या कोरोना रुग्णांची आणि आठ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. दुसरीकडे 321 जण दिवसभरात बरे झाले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये पनवेल तालुक्यातील 278, अलिबाग 43, माणगाव 38, पेण 27, महाड 26, उरण, खालापूर व रोहा प्रत्येकी 20, कर्जत 19, सुधागड 11, मुरूड सात, पोलादपूर चार आणि श्रीवर्धन तालुक्यातील एकाचा समावेश आहे, तर मृत रुग्ण पनवेल तालुक्यात तीन आणि कर्जत, पेण, अलिबाग, सुधागड व महाड तालुक्यात प्रत्येकी एक असे आहेत. नव्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 27,137 व मृतांची संख्या 800 झाली आहे. जिल्ह्यात 22,845 जण कोरोनामुक्त झाल्याने 3492 विद्यमान रुग्ण आहेत.

Check Also

खासदार बारणेंच्या विजयासाठी पनवेलमध्ये जोरदार प्रचार

आमदार प्रशांत ठाकूर, माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांचा सहभाग पनवेल : रामप्रहर वृत्त मावळ …

Leave a Reply