भंडारा, गोंदिया : प्रतिनिधी
मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाचा सर्वाधिक फटका पूर्व विदर्भातील जिल्ह्यांना बसला आहे. पवनी तालुक्यात असलेल्या गोसेखुर्द धरणाचे सर्व 33 दरवाजे चार मीटरने उघडण्यात आल्याने पूरस्थिती निर्माण झाली आहे. भंडारा, गोंदिया जिल्ह्यातील नदीकाठावरील गावांमध्ये पाणी शिरल्याने सर्वसामान्यांचे हाल होत आहेत. भंडारा शहरातील बर्याच भागांमध्ये पुराचे पाणी शिरले असून, लोकांना त्यांच्या घराच्या छतावर आश्रय घ्यावा लागला आहे. भोजापूर पुलावर पाणी आल्याने भंडारा-नागपूर राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आला तसेच भंडारा-तुमसर रस्तासुद्धा बंद झाला आहे.