Breaking News

मोहोपाड्यातील सीसीटीव्हींकडे दुर्लक्ष

कॅमेरे बंद अवस्थेत आणि गायब

मोहोपाडा : प्रतिनिधी

रसायनी पाताळगंगा हा औद्योगिक परीसर असून या परिसरातील मोहोपाडा ही मुख्य बाजारपेठ आहे. त्यामुळे काही वर्षांपूर्वी या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले. परंतु जबाबदारी घेतलेल्या संबंधितांकडून कॅमेरांची देखभाल करण्यात आली नाही. परिणामी काही कॅमेरे बंद अवस्थेत आहेत, तर काही कॅमेरेच गायब करण्यात आले आहे. संबंधित प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे.

मोहोपाडा बाजारपेठेत रसायनी व आसपासच्या परिसरातील ग्रामीण भागातील नागरिक खरेदी विक्रीसाठी येत असतात. तसेच मोहोपाडा येथे अनेक बँकांच्या शाखा, शासकीय कार्यालये असल्याने परिसरातील नागरिकांची सुट्टीचा दिवस वगलता बँकेत तसेच एटीएम मशिनवर पैसे काढण्यासाठी मोठी गर्दी असते. याअगोदर मोहोपाडा बाजारपेठ, नवीन पोसरी व मोहोपाडा टाकेदेवी रिक्षा थांबा ते मच्छीमार्केट हा परीसर सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद होता. यासाठी मोहोपाडा पोलीस चौकीत मुख्य रस्त्यावर सीसीटीव्ही कॅमेरे कंट्रोल संच बसविण्यात आला आहे. या सीसीटीव्ही कॅमेर्‍यातील गुरूकृपा समोरील बंद कॅमेरे वगळता पोलीस चौकीजवलील आणि नवीन पोसरी प्रबोधनकार ठाकरे चौकातील सीसीटीव्ही कॅमेरेच गायब झाले आहेत.

दरम्यान, या सीसीटीव्ही कॅमेर्‍यामुळे गेल्या काही वर्षांत काही छोटे-मोठे गुन्हे उघडकीसही आले आहेत. या सीसीटीव्ही कॅमेर्‍यांचा पोलिसांना खुपच फायदा होत होता. सीसीटीव्ही देखभालीची जबाबदारी वासांबे (मोहोपाडा) ग्रामपंचायतीने घेतली असतानाही सध्या दुर्लक्ष होताना दिसत आहे. काही महिन्यांत रस्त्यामध्ये एखाद्याला एकांतात गाठून संमोहित करून लुटण्याचे प्रकार रसायनी परिसरात वाढत असल्याचे चित्र दिसून येते.काही दिवसांपुर्वीच रिस येथे टिसीआय गोडावूनसमोर एका ज्येष्ठ नागरिकाला दोन अज्ञात व्यक्तींनी आपण पोलीस असल्याचे सांगून लुटण्याचा प्रकार ताजा असतानाच रिस येथील ओमकार चायनीजसमोर एका दुचाकी स्वाराला अशाचप्रकारे लुटण्यात आले. तर नुकतेच पराडे कॉर्नर येथे एका महिलेलाही संमोहित करून तिच्या कानातले सोन्याचे दागिने लूटल्यानंतर काही वेळाने आपण फसलो गेल्याचा प्रकार तिच्या लक्षात आले. या चोरट्यांचा रसायनी पोलीस तपास करीत आहेत.

वासांबे (मोहोपाडा) ग्रामपंचायत हद्दीत कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळत असतानाही मोहोपाडा रविवार आठवडा बाजार भरला जात आहे. यामध्ये लहानसहान चोर्‍यांच्या घटना घडत आहेत. यातच गुन्हेगार सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद नसल्याने शोध घेणे कठीण झाले आहे. यासाठी मोहोपाडा मुख्य थांब्यावरील व बाजारपेठ परीसरातील सर्व सीसीटीव्ही कॅमेरे पुर्ववत सुरू करावेत तसेच रसायनी परीसरातील वावेघर थांबा, पराडे कॉर्नर, गणेशनगर थांबा, कांबे थांबा व रिस थांबा याठिकाणी सिसीटीव्ही कॅमेरा बसविण्यात यावेत, अशी मागणी परीसरातील नागरिक करीत आहेत. दरम्यान, यासंदर्भात प्रस्तुत प्रतिनिधीने वासांबे (मोहोपाडा) ग्रामपंचायतीच्या सरपंचांशी संपर्क साधला असता मोहोपाडा, नवीन पोसरी व पोलीस चौकीजवळ कनेक्शन असलेले सर्व सीसीटीव्ही कॅमेरे लवकरच दुरुस्ती करण्यात येतील असे सरपंच ताई पुंडलिक पवार यांनी सांगितले.

मोहोपाडा पोलीस चौकीजवळील सर्व सीसीटीव्ही कॅमेरे पुर्ववत सुरु करावेत, यासाठी वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायतीला एक महिन्यांपुर्वी पोलीस ठाण्याकडून पत्र देण्यात आले आहे.

-सुजाता तानवडे, निरीक्षक, रसायनी पोलीस ठाणे

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply