मायामी : वृत्तसंस्था
अव्वल सीडेड नोव्हाक जोकोविचचे विक्रमी सातव्यांदा मायामी ओपन टेनिस स्पर्धेचे विजेतेपद मिळवण्याचे स्वप्न भंगले. त्याला पुरुष एकेरीच्या चौथ्या फेरीत 22व्या सीडेड रोबेर्टो बटिस्टा अगुटकडून पराभव पत्करावा लागला. पहिला सेट सहज गमावूनही अगुटने चिवट लढा देत ही लढत जिंकून उपांत्यपूर्व फेरीतील प्रवेश निश्चित केला.
पुरुष एकेरीच्या चौथ्या फेरीत 30 वर्षीय स्पेनच्या अगुटने सर्बियाच्या जोकोविचचे आव्हान 1-6, 7-5, 6-3 असे परतवून लावले. जागतिक क्रमवारीत जोकोविच अव्वल, तर अगुट 25व्या स्थानावर आहे. यापूर्वी हे दोघे 9 वेळा आमनेसामने आले होते. त्यातील सात लढती जोकोविचने जिंकल्या होत्या, मात्र या वर्षाच्या सुरुवातीला झालेल्या दोहा ओपनमध्ये अगुटने जोकोविचाला नमविले होते. या वेळी कोण बाजी मारणार, याबाबत उत्सुकता होती. जोकोविचने पहिल्या सेटमध्ये अवघ्या 25 मिनिटांत 5-0 अशी आघाडी घेतली होती. त्यामुळे ही लढत एकतर्फी होईल, असे वाटत होते. पहिला सेट जोकोविचने 6-1 असा सहज जिंकला. यानंतर हलक्या पावसामुळे दुसरा सेट थोड्या उशिराने सुरू झाला. या ‘ब्रेक’नंतर मात्र अगुटचा रंगच बदलला होता. त्याने चिवट लढा देत पुढील दोन्ही सेट जिंकून जोकोविचला घरचा रस्ता दाखविला. आता अगुटची उपांत्यपूर्व फेरीत गतविजेत्या जॉन इस्नरविरुद्ध लढत होईल.
विजयानंतर अगुट म्हणाला, हा विजय माझ्यासाठी विशेष आहे. या लढतीत मी आक्रमक खेळण्याचा प्रयत्न केला. जोकोविचने कोर्ट सोडताच थेट पत्रकार परिषदेत दाखल झाला. तो म्हणाला, अगुट हा जबरदस्त खेळाडू आहे, मात्र ही लढत मी गमवायला नको होती. कारण मी अनेक संधी वाया घालवल्या.
खरे तर माझी सुरुवात चांगली झाली होती, मात्र दोन-तीन गेममध्ये माझा आळस नडला.