उलवे नोड : रामप्रहर वृत्त
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून उलवे नोडमध्ये भव्य उत्सवाचे आयोजन गुरुवारी करण्यात आले होते. या उत्सवाचे मुख्य आकर्षण रामशेठ ठाकूर मैदान येथे द फोक आख्यान अंतर्गत झालेला महाराष्ट्राचा शाहिरी बाणा हा विशेष कार्यक्रम ठरला. सुप्रसिद्ध शाहीर चंद्रकांत माने आणि शाहिरा ऋतुजा माने यांनी आपल्या खणखणीत आवाजात आणि प्रभावी सादरीकरणातून शिवचरित्र, महाराष्ट्राचा देदीप्यमान इतिहास, मावळ्यांचा पराक्रम आणि मराठी संस्कृतीचे दर्शन घडवले.
छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती, गव्हाणच्या वतीने हा सोहळा अत्यंत उत्साहात आणि पारंपरिक वातावरणात पार पडला. या सोहळ्यास माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे ज्येष्ठ नेते जे.एम. म्हात्रे, उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी, राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, पंचायत समिती सदस्य जिज्ञासा कोळी, वितेश म्हात्रे, माजी सदस्य भाऊशेठ पाटील, रत्नप्रभा घरत, पनवेल महापालिकेचे नगरसेवक अजय बहिरा, विकास घरत, सुमित झुंझारराव, नगरसेविका राजश्री वावेकर, न्हावे ग्रामपंचायतीचे सरपंच विजेंद्र पाटील, कामगार आघाडीचे प्रदेश सचिव संजय भगत, सागर ठाकूर, भार्गव ठाकूर, स्वप्नील ठाकूर, विश्वनाथ कोळी, सुधीर ठाकूर, सी.एल. ठाकूर, अनिल खोडपे, किशोर पाटील, सचिन घरत, योगिता भगत, निलेश खारकर, साईचरण म्हात्रे, ज्योत्स्ना ठाकूर, वंदना पाटील, उत्सव समितीचे अध्यक्ष वसंत पाटील, उपाध्यक्ष अशोक कडू, जयवंत देशमुख, खजिनदार गजानन घरत, राज ठाकूर, प्राप्ती ठाकूर, रोशन म्हात्रे, सायली वाडवळकर, कमलेश कुमार, बंटी घरत, अपूर्व ठाकूर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या वेळी शाहिरांच्या पोवाड्यांनी उपस्थितांच्या अंगावर शहारे आणले, तर इतिहासातील विविध प्रसंगांच्या जिवंत सादरीकरणामुळे मैदानावरील वातावरण शिवमय झाले होते. या सांस्कृतिक सोहळ्याला उलवे नोडसह परिसरातील असंख्य शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दाद दिली.
सोहळा यशस्वी करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा उभारणी व सुशोभीकरण समितीसह गव्हाण, कोपर, शेलघर, शिवाजीनगर, बेलपाडा, न्हावा, न्हावाखाडी, उलवे, वहाळ, मोरावे, बामणडोंगरी, जावळे आणि उलवे नोड येथील ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमामुळे शिवरायांच्या विचारांचा जागर झाला आणि परिसरातील सांस्कृतिक एकजूटही अधोरेखित झाली.
Check Also
भाजपकडून महिला सक्षमीकरणासाठी बळ दिले जाते -आमदार प्रशांत ठाकूर
पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्ष नेहमीच महिलांना शक्ती देण्याचे आणि त्यांना सक्षम करण्याचे काम …
RamPrahar – The Panvel Daily Paper