Breaking News

पिकेल ते विकेल योजनेचा शेवटच्या घटकापर्यंत लाभ मिळावा -आमदार रविशेठ पाटील

पेण : प्रतिनिधी

राज्य शासनाने पिकेल ते विकेल ही योजना नुकतीच जाहीर केली आहे. या योजनेचा लाभ पेण मतदारसंघातील शेतकरी व आदिवासी बांधवांना मिळावा तसेच या योजनेची माहिती त्यांना मिळावी यासाठी आमदार रविशेठ पाटील यांच्या पेण येथील निवासस्थानी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या योजनेचा शेवटच्या घटकापर्यंत लाभ मिळवून देण्यासाठी कृषी विभागाने प्रयत्नशील राहावे, असे आमदार पाटील यांनी यांनी या वेळी अधिकार्‍यांना सूचित केले. 

या मार्गदर्शन शिबिरास भाजप जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील, पेण तालुकाध्यक्ष श्रीकांत पाटील, रविकांत म्हात्रे, वासुदेव म्हात्रे, शिवाजी पाटील, रोहिदास जाधव, चंद्रकांत लखीमले, अनिल पवार, निलेश फाटक, महेश भिरकावले, मारुती कुर्‍हाडे, लक्ष्मण पाटील, लहू आंब्रे, सुरेश बने आदींसह आदिवासी बांधव व शेतकरी उपस्थित होते.

आमदार रविशेठ पाटील यांनी पुढे बोलताना सांगितले की, आपण कुठल्या कुठल्या भाजीपाल्यांचे उत्पादन कशा प्रकारे घेतोय तसेच आपला माल विक्रीसाठी मार्केटमधील व्यवस्थापनाचा आराखडा तयार करणे याचे प्रशिक्षण देण्यात  येणार आहे. आदिवासी शेतकर्‍यांनी यासाठी संघटीत होणे गरजेचे आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सातबारा असणे आवश्यक आहे, परंतु मार्केट व्यवस्थेसाठी त्याची गरज नसल्याचे ते म्हणाले.

कृषी अधिकारी अनिल रकडे यांनी सांगितले की, आदिवासी बांधवांना मुख्य प्रवाहात आणून त्यांच्या उन्नतीसाठी प्रयत्न करणार असून, शेतकरी गट स्थापन करण्यात येऊन त्या माध्यमातून पिकेल ते विकेल ही योजना यशस्वी केली जाईल.

या योजनेचा आदीवासी बांधवांना नक्कीच फायदा होईल, असे वैकुंठ पाटील म्हणाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस शिवाजी पाटील यांनी व्यक्त केले. या वेळी खरबाची वाडी, विराणी, दिवाणमाळ, भोरमाळ आदिवासी वाडी येथील आदिवासी शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

जितेंद्रशी आपला ‘परिचय’ असादेखील…

2001च्या मे महिन्यातील गोष्ट. तुषार कपूरचा रुपेरी पडद्यावरील पदार्पणातील ‘मुझे कुछ कहना है’च्या पूर्वप्रसिद्धीत रंग …

Leave a Reply