Breaking News

प्रश्न लाखोंच्या रोजगाराचा

कोरोनाच्या आघाडीवर देशातील परिस्थिती काहिशी अधिक नियंत्रणात येत आहे असे राष्ट्रीय पातळीवरील ताज्या आकडेवारीवरून दिसते. त्यामुळेच ऑक्टोबरपासून सुरू व्हावयाच्या नव्या अनलॉक 5 बद्दल लोकांच्या मनात बर्‍याच अपेक्षा आहेत. महाराष्ट्रात नव्या नियमावलीसह हॉटेल्स पुन्हा पूर्ववत सुरू करण्यास राज्य सरकारने परवानगी दिल्याचेही समजते. अर्थात येत्या महिन्यापासून सुरू होणार्‍या सणासुदीच्या हंगामामुळे खबरदारीही अधिक घ्यावी लागणार आहे.

देश पातळीवर मंगळवारी जाहीर करण्यात आलेली कोरोनासंबंधी आकडेवारी काहिशी दिलासादायक आहे. देशातील दैनंदिन केसेसचा आकडा 75 हजारांच्या खाली गेला असून तब्बल एक महिन्यानंतर एका दिवसातील मृतांची संख्या हजाराच्या खाली नोंदली गेली आहे. मंगळवारी देश पातळीवर 70 हजार 589 नव्या केसेसची नोंद झाली. देशातील आजवरच्या कोविड-19 रुग्णांची संख्या 61 लाखांच्या पुढे गेली असली तरी त्यापैकी फक्त नऊ लाख 47 हजार 576 रुग्ण इस्पितळात उपचार घेत आहेत. देशाचा रिकव्हरी रेट अर्थात रुग्ण बरे होण्याचा दर अवघ्या जगात सर्वाधिक 83.01 टक्के इतका आहे. त्याच वेळेस मृत्यूदर अवघा 1.57 टक्के इतका आहे. आजवर 51 लाखांहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत, तर 96 हजार 318 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अर्थात काही तज्ज्ञ डॉक्टरांनी म्हटल्याप्रमाणे आकडेवारी दिलासादायक असली तरी आपल्या जवळच्या कुणाच्या जाण्याचे दु:ख त्याने कमी होऊ शकत नाही. त्यामुळे एकीकडे या दिलासादायक आकडेवारीमुळे अर्थव्यवस्थेला चालना देण्याच्या सरकारी प्रयत्नांना वेग येणार आहे, तर त्याच वेळेस पाठोपाठ ऑक्टोबरच्या मध्यापासून सुरू होणार्‍या सणासुदीच्या हंगामामुळे लोकांनी अधिकाधिक दक्षता घेण्याची गरजही तितकीच आहे. महाराष्ट्रातील परिस्थिती अन्य राज्यांच्या तुलनेत आजही बिकटच आहे. राज्यात गेले अनेक दिवस रोज 20 हजारांहून अधिक केसेसची नोंद होत होती, परंतु सोमवारी नव्या केसेसचा आकडा घसरून 11 हजार 921वर गेल्याचे दिसूून आले. राज्यातील आजवरच्या एकूण कोरोना रुग्णांची संख्या 13 लाख 51 हजारांच्या पुढे केली असून यात 35 हजार 751 मृतांचा तसेच 10 लाख 49 हजारांहून अधिक बर्‍या झालेल्या रुग्णांचा समावेश आहे. ऑक्टोबर महिन्यापासून सुरू होणार्‍या अनलॉक 5 बद्दल लोकांच्या बर्‍याच अपेक्षा असल्या तरी राज्यातली बिकट परिस्थिती लक्षात घेता व्यवहार पूर्ववत करतानाच लोकांनी दक्षतांबाबतीतही पूर्वीइतकेच जबाबदारीने वागायला हवे. सिनेमागृहे, लोकल रेल्वे सुरू होणार का, याबद्दल सगळ्यांनाच उत्सुकता असून अनलॉक 5 बद्दलची केंद्र सरकारची घोषणा लवकरच अपेक्षित आहे. दरम्यान, पश्चिम बंगालमधील आगामी दुर्गापूजेचे उत्सवी वातावरण लक्षात घेऊन तिथल्या राज्य सरकारने सिनेमागृहे सुरू करण्यास परवानगी दिली आहे. अर्थात बरीच खबरदारी घेऊनच ती सुरू करता येतील. महाराष्ट्र सरकारनेही हॉटेल्स पूर्ववत सुरू करण्यास परवानगी दिल्याचे सांगितले जात आहे. त्यासंदर्भात नवी नियमावली आखण्यात आली असून बहुधा 50 टक्के क्षमतेनेच हॉटेलांना व्यवसाय करता येईल. अंतर राखण्याबाबतची दक्षता घेऊनच लोकांना प्रवेश दिला व संसर्ग पसरू नये याकरिता सर्व दक्षता घेतल्या तरच या प्रयत्नांना यश मिळू शकेल. ही दक्षता हॉटेल चालवणार्‍या व्यावसायिकांबरोबरच ग्राहकांनीही घ्यायला हवी. प्रश्न लाखो लोकांच्या रोजगाराशी निगडित आहे याचे भान सगळ्यांनीच बाळगायला हवे.

Check Also

केंद्र सरकार पाच वर्ष टिकेल -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत ः प्रतिनिधी मला या निवडणुकीत खूप काही शिकता आले. विरोधकांनी जाती जातीत तेढ निर्माण …

Leave a Reply