पनवेल : रामप्रहर वृत्त
नवरात्रोत्सवानिमित्त श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संस्थेचे संस्थापक संभाजी भिडे यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेलमध्ये दुर्गामाता दौड हा उपक्रम राबविला जात आहे. मागील चार वर्षांपासून 40 ते 50 युवकांच्या संख्येने निघणारी दौड यंदा कोविड-19चा प्रादुर्भाव पाहता मोजक्याच संख्येने काढली जात आहे.
श्री दुगार्माता दौड ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री जिजामाता यांनी शिवराय गर्भात असताना आलेल्या नवरात्रीत फक्त भोसले कुळासाठी नाही, तर काश्मीर ते कन्याकुमारी व ब्रह्मदेश ते बलुचिस्तान उभ्या-आडव्या पसरलेल्या हिंदुस्थानच्या उरातून जुलमी राजशाही संकट दूर करून भारतमातेच्या उज्ज्वल भवितव्यासाठी सुरू केली होती. जे मागणे त्यांनी मागितले त्याचा प्रसाद म्हणजे शिवरायांचा जन्म. हाच उदात्त भाव अंत:करणात धारण करून प्रतिवर्षी नवरात्रात श्री दुर्गामातेच्या पायाशी दौडत जाणे म्हणजे नवरात्र-श्री दुर्गामाता दौड. महाराष्ट्रात ही दौड भिडे गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली गेल्या 35 वर्षांपासून सुरू असून, यामध्ये तरुण पिढीचा सक्रिय सहभाग दिसून येतो. पनवेलमध्येही हा उपक्रम उत्साहाने राबविला जात आहे.