नवी दिल्ली : वृत्तसंस्था
आत्मनिर्भर भारत या मोहिमेतंर्गत भारतीय लष्कराने व्हॉट्सअॅपप्रमाणेच एक नवे अॅप्लिकेशन विकसित केले आहे. सिक्युअर अॅप्लिकेशन फॉर द इंटरनेट (साई) असे या अॅपचे नाव आहे. हे अॅप इंटरनेटद्वारे अॅण्ड्रॉईड प्लॅटफॉर्मवर एण्ड टू एण्ड सुरक्षित वॉईस कॉल, संदेश पाठवणे आणि व्हिडीओ कॉलिंगसारख्या सुविधा देते. लष्कराद्वारे विकसित करण्यात आलेले साई अॅप कमर्शिअल मेसेजिंग अॅप टेलिग्राम, संवाद यांच्यासारखेच आहे. हे एण्ड टू एण्ड इनक्रिप्शन मेसेजिंग प्रोटोकॉलचा वापर करते. लोकल इन हाऊस सर्व्हर आणि कोडिंगसोबतच सुरक्षेच्या फीचर्सच्या बाबतीत इतर अॅपपेक्षा साई उत्तम आहे. त्यांना आवश्यकतेनुसार बदलणेदेखील शक्य आहे. या अॅपची चाचणी घेण्यात आली आहे. एनआयसीवर इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राईट्सच्या फायलिंगवरही काम सुरू आहे. याव्यतिरिक्त हे अॅप आयओएस प्लॅटफॉर्मवरही आणण्याचे काम सुरू आहे, असे संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे.