कराची : वृत्तसंस्था
वर्ल्डकपदरम्यान खेळाडूंचे लक्ष विचलित होऊ नये म्हणून पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आपल्या खेळाडूंना भारताविरुद्ध होणार्या सामन्यानंतरच आपल्या कुटुंबांना इंग्लंडला बोलावण्याची परवानगी दिली आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात 16 जून रोजी वर्ल्ड कपमधील लढत होणार आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लढती हे वर्ल्ड कप क्रिकेटचे नेहमीच आकर्षण राहिले आहे. विशेष म्हणजे या लढतींमध्ये भारताने नेहमीच पाकिस्तानला धूळ चारली आहे. त्यामुळे भारताविरुद्धच्या सामन्यात कोणताही धोका पत्करण्यास पाक बोर्ड तयार नाही. म्हणूनच त्यांनी या सामन्यानंतरच खेळाडूंच्या कुटुंबीयांना तिथे आणण्याची परवानगी दिली आहे.
इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या मालिकेत पाक बोर्डाने आपल्या खेळाडूंच्या पत्नी आणि मुलाबाळांना त्यांच्यासोबत राहण्याची परवानगी दिली होती, पण वर्ल्डकपदरम्यान ही परवानगी देण्यास बोर्ड तयार नव्हते. इतर संघातील खेळाडूंना आपल्या पत्नी व मुलांसह राहण्याची परवानगी देण्यात आल्यानंतर पाक बोर्डाने आपला निर्णय बदलला, मात्र भारताविरुद्धच्या सामन्यानंतरच ती परवानगी दिली आहे.