पुणे ः प्रतिनिधी
हिंमत असेल तर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने वेगवेगळे लढावे, असे जाहीर आव्हान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिले आहे, पण तुमच्यात हिंमत नाही. कशाचा कशाला पत्ता नाही. झेंडा वेगळा, तत्त्वे वेगळी आणि एकत्र लढता. आम्हाला काही फरक पडत नाही. आमची सगळ्या गोष्टींची तयारी असून, पाच वर्षे सरकार चालवले तर प्रखर विरोधी पक्ष म्हणून तुमची झोप हराम करण्याची आमची तयारी आहे, असेही पाटील यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. पाटील पुढे म्हणाले की, भाजपवर टीका करणे हे संजय राऊतांचे कर्तव्य आहे. ते त्यांनी बजावले पाहिजे. त्यामुळे तर त्यांची पक्षात आहे. म्हणून त्यांनी टीका केल्यावर काही आश्चर्य वाटत नाही. आमच्यावर अनेकदा अग्रलेखही असतात. त्यात काही विशेष नाही. शरद पवार महाराष्ट्र चालवतात, उद्धव ठाकरे नाही हे त्यांनी मान्यच केले आहे. आता ते पवारांचा सल्ला घेऊ देत किंवा पार्थ पवारांचा, असा टोलाही पाटील यांनी लगावला. संजय राऊत यांनी निवडणूक आयोग भाजपची शाखा असल्याची टीका केली आहे. त्यासंबंधी विचारले असता पाटील म्हणाले की, आपल्या बाजूने निर्णय झाला की सगळे चांगले. पंजाब निवडणुकीत विजय झाला की निवडणूक आयोग चांगले, नाही तर वाईट हे त्यांचे सोयीचे राजकारण आहे. महाविकास आघाडीला एक वर्ष पूर्ण होत असताना चंद्रकांत पाटलांनी सरकारच्या कामगिरीला शून्य मार्क दिले. सरकार चालवताना कोरोनाचा जो मोठा कालावधी गेला त्यात काय झाले हे सर्वसामान्यांना विचारा. मराठवाड्यात अतिवृष्टीचा फटका बसलेल्यांना, पश्चिम महाराष्ट्रात कर्ज वेळेवर भरणार्या शेतकर्यांना प्रोत्साहन अनुदान मिळाले का विचारा, असे ते म्हणाले. चांगल्याला चांगले म्हणणे ही महाराष्ट्राची संस्कृती आहे आणि आम्ही ती स्वीकारली, पण फडणवीसांनी केलेले सगळे महाविकास आघाडीने रद्द केले, याकडेही पाटील यांनी लक्ष वेधले.