Breaking News

सायन-पनवेल मार्गावर तीन सिग्नल

पनवेल : बातमीदार

सायन-पनवेल मार्गावर सध्या रस्ता रुंदीकरण आणि उड्डाणपुलांची कामे सुरू आहेत. त्यामुळे येथील वाहतुकीचा वेग मंदावला आहे. मात्र त्यातच सानपाडा जंक्शनपासून पुढे उरण फाट्यापर्यंत कुठेही सिग्नल यंत्रणा कार्यान्वित नसल्याने वाहतुकीचा आणखी गोंधळ उडत आहे. हा गोंधळ टाळण्यासाठी आता या मार्गावर तुर्भे ते उरण फाटादरम्यान तीन ठिकाणी सिग्नल बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी पालिकेने सिग्नल यंत्रणा बसविण्यासाठी निविदाही मागविल्या आहेत.

सायन-पनवेल महामार्ग हा वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असा मार्ग आहे. या मार्गावरून पुण्याकडे आणि कोकणाकडे जाणार्‍या वाहनांची नेहमीच वर्दळ असते. दिवसेंदिवस या मार्गावरील वाहतुकीचा ताण वाढत आहे. या रस्त्याचे रुंदीकरण सुरू आहे. त्यामुळे वाहतुकीवर त्याचा परिणाम होत आहे. या मार्गावरून तुर्भे येथील जंक्शनवर चार दिशांनी येणारी वाहने असल्याने नेहमी वाहतुकीचा गोंधळ होतो. लहान-सहान अपघात घडतात. त्याचबरोबर पुढे नेरूळ एलपी बस थांब्याजवळही नेरूळच्या आतील भागात जाणार्‍या गाड्या वळत असतात आणि त्याच वेळी आतून महामार्गावर येणार्‍या वाहनांची घाई असते. त्यामुळे या जंक्शनवर खोळंबा होतो. त्याच्या बरोबर पुढे उरण फाट्यावरून उरणकडे जाणार्‍या, पुण्याकडे जाणार्‍या आणि येणार्‍या वाहनांचा एकमेकांना अंदाज येत नाही. त्यामुळे येथे ही अपघात घडतात. त्यामुळे या तिन्ही महत्त्वाच्या मार्गांवर वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी सिग्नल बसवले जाणार आहेत. यासाठी पालिका 15 लाख 49 हजार 275 इतकी रक्कम खर्च करणार आहे. ही सिग्नल यंत्रणा सुरू झाली की, वाहनांची होणारी कोंडी सुटू शकेल आणि वाहतूकही सुरळीत होईल, असा विश्वास

पालिकेला आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply