थकीत देयके न दिल्यास काम बंद आंदोलन
पाली : प्रतिनिधी
कंत्राटदारांची थकीत देयके दिवाळीपूर्वी अदा केली नाही तर 25 नोव्हेंबरपासून स्थानिकस्तरावर काम बंद आंदोलन, नंतर शासकीय कार्यालयास कुलूप लावून ठिय्या आंदोलन व उपोषण करण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाने राज्य शासनाला निवेदनाद्वारे दिला आहे.
राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम व संबंधित खात्याच्या मंत्र्यांकडे आठ महिन्यांपासून राज्यातील कंत्राटदारांची हजारो कोटी रुपयांची देयके प्रलंबित आहेत. याबाबत तब्बल 16 विनंती पत्रे कंत्राटदार महासंघ व राज्य अभियंता संघटनेने दिली आहेत. कोविड नसतांनादेखील राज्य शासनाने कोविडचे कारण पुढे करुन जाणीवपूर्वक कंत्राटदार, सुशिक्षित बेरोजगार अभियंता व मजुर सहकारी संस्था यांची देयके देण्यासाठी निधीच दिला नाही. त्यामुळे राज्यातील तीन लाख कंत्राटदार व त्यावर अवलंबून असणार्या घटकांची व कुटुंबांची उपासमार व वाताहत झाली आहे. त्यामुळे कंत्राटदार संतापले असून त्यांनी ही दिवाळी काळी दिवाळी म्हणून साजरा करण्याचे ठरविले असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
राज्य कंत्राटदार आणि राज्य अभियंता संघटनेच्या वतीने हे निवेदन राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री, ग्रामविकास मंत्री, जलसंपदा मंत्री, नगरविकास मंत्री यांना पाठविण्यात आले आहे. निवेदनावर राज्य अध्यक्ष इंजि मिलिंद भोसले, कार्याध्यक्ष संजय मैंद, महासचिव सुनील नागराळे, निवास लाड, मराठवाडा विभागीय अध्यक्ष अनिल पाटील, विदर्भ विभागीय अध्यक्ष सुबोध सरोदे, कोकण विभागीय अध्यक्ष प्रकाश पालरेचा, उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष प्रकाश पांडव, मुंबई ठाणे विभागीय अध्यक्ष मंगेश आवळे, प्रसिध्द प्रमुख कौशिक देशमुख आदींच्या स्वाक्षर्या आहेत.
थकीत देयके दिवाळीपूर्वी न दिल्यास ज्या विभागांचे मंत्री आहेत त्यांच्या घरासमोर आंदोलन केले जाईल. त्यानंतर हिवाळी अधिवेशनात मोठे उग्र आंदोलन करण्यात येईल.
-प्रकाश पालरेचा, कोकण विभागीय अध्यक्ष, राज्य कंत्राटदार महासंघ
थकीत देयकांची रक्कम
सार्वजनिक बांधकाम विभाग- 3.5 हजार कोटी
ग्रामविकास विभाग- 750 कोटी
नगरविकास विभाग- 2700 कोटी
जलसंपदा विभाग- 679 कोटी