Breaking News

अल्पवयीन मुलीवर बलात्कार; आरोपीस आजन्म कारावास

अलिबाग : प्रतिनिधी

अल्पवयीन मुलीच्या अजाणतेपणाचा गैरफायदा घेऊन आणि तिला धमकावून तिच्यावर सहा वर्षे बलात्कार करणार्‍या आरोपीला येथील विशेष न्यायालयाने आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली आहे. तसेच 1 लाखाचा दंडही ठोठावला आहे. मोरेश्वर उर्फ नारायण गोविंद पेरेकर (रा. रेवस कोळीवाडा, ता. अलिबाग) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.

पीडित मुलगी ही आरोपीच्या मुलीची मैत्रीण असल्याने  तिचे आरोपीच्या घरी जाणे-येणे होते. 2012 ला आरोपीने आपल्या मुलीवर प्रथम  लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर तिला धमकावून, तिचे नग्न फोटो, क्लिप सर्वांना दाखवेन अशी भीती घालून वारंवार बलात्कार केला आणि अखेर असह्य झाल्यानंतर त्या मुलीने आपल्यावर होत असलेल्या अत्याचाराला आईजवळ वाचा फोडली. त्यामुळे पीडित मुलीच्या आईने 12 एप्रिल 2019 रोजी मांडवा पोलीस ठाणे गाठले आणि आरोपी मोरेश्वर उर्फ नारायण पेरेकर याच्या विरोधात मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी फिर्याद दाखल केली.

पोलिसांनी आरोपी विरोधात भा. दं. वि. कलम 376(2) (आय)(एन) 354सी, 506(1) सह  बालकांचे लैंगिक शोषणापासून संरक्षण कायदा कलम 5 (एल) सह कलम 6, 9 (एल) (एफ) सह इतर कलमान्वये गुन्हा दाखल केला होता. तपास पूर्ण करून मांडवा पोलिसांनी अलिबाग येथील विशेष न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. खटल्याची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. एम. मोहिते यांच्यासमोर सुरू होती. त्यानंतर विशेष  न्यायाधीश एस. एस. शेख यांच्या न्यायालयात पुढील सुनावणी होऊन अंतरिम युक्तिवाद  झाला.

सरकार पक्षातर्फे अतिरिक्त अभियोक्ता अ‍ॅड. अश्विनी बांदिवडेकर-पाटील यांनी एकूण 8 साक्षीदार तपासले. पीडित मुलगी, फिर्यादी असलेली तिची आई, पंच विजया पाटील व केमिकल अ‍ॅनालायझर प्रियांका देशमुख यांची साक्ष आणि तपास अंमलदार के. डी. कोल्हे, सहाय्यक पोलीस निरीक्षक मेघना बुरांडे यांचा तपास महत्वाचा ठरला. पैरवी अधिकारी सायगावकर, मुळे, पोलीस हवालदार सचिन खैरनार, नानू ठाकूर यांचे सहकार्य मोलाचे ठरले. सरकारी अभियोक्ता अ‍ॅड. अश्विनी बांदिवडेकर-पाटील यांनी मांडलेला अंतरिम युक्तिवाद विशेष न्यायालयाने ग्राह्य धरून आरोपी मोरेश्वर उर्फ नारायण गोविंद पेरेकर याला दोषी ठरवून आजन्म कारावास आणि एक लाख रुपये दंड अशी शिक्षा सुनावली.

Check Also

गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, नैना, पायाभूत सुविधासंदर्भात योग्य नियोजन व्हावे

आमदार प्रशांत ठाकूर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, …

Leave a Reply