Breaking News

आ. मंदा म्हात्रेंच्या प्रयत्नाने उभारण्यात आलेल्या दिवाळेतील फगवाले जेट्टीचे लोकार्पण

नवी मुंबई : बातमीदार

बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदा म्हात्रे यांच्या प्रयत्नाने आमदार निधीतून उभारण्यात आलेल्या दिवाळे गावातील फगवाले जेट्टीचा उद्घाटन सोहळा भारतीय जनता पक्षाचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत यांच्या हस्ते बुधवारी (दि. 11) झाला. या वेळी जेट्टीच्या कामास 65 लाख रुपये इतका खर्च झाला असून पुढील रेलिंगच्या कामांसही साडे सात लाख रुपये रकमेची तरतूद आमदार निधीतून करण्यात आली आहे. या उद्घाटनाच्या वेळी आमदार म्हात्रे म्हणाल्या की, दिवाळे गावातील स्थानिक मच्छीमार बांधवांना त्यांच्या होड्या लावण्याकरिता, त्यांना मासेमारीला जाण्याकरिता सोयी उपलब्ध व्हाव्या याकरिता त्यांनी जेट्टी निर्माण करावी अशी मागणी केली होती. त्यानंतर माझ्या आमदार निधीतून तसेच मेरिटाईम बोर्डाच्या माध्यमातून या जेट्टीचे काम पूर्ण केले. या जेट्टीच्या बाजुतील रेलिंगच्या कामास ही लवकरच सुरुवात होणार असून त्याकरिता माझ्या आमदार निधीतून तरतूद करण्यात आली आहे. दिवाळे गावात दिवाळी सणाला खूप महत्व देण्यात येत असून या वेळी त्यांच्या गावातील ग्रामस्थांचे बैरी देव हे तीन दिवसांकरिता त्यांच्या गावातील मंदिरात स्थानापन्न झालेले असतात. गावातील बैरी देव यांचे वाजत गाजत आगमन व्हावे याकरिता या जेट्टीचे लोकार्पण करण्यात आले. दिवाळे गावातील जेट्टी करीता 10 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. परंतु काही परवानग्या अभावी कामांना सुरुवात करण्यात आली नसल्याचे त्यांनी सांगितले. गावातील मच्छी मार्केटच्या कामासाठीही पर्यावरण विभागाच्या परवानगीची आवश्यकता असून सदरची बाब ही कोर्टात प्रलंबित आहे. याबाबतचे ना हरकत प्रमाणपत्र मिळाल्यास सुसज्ज सर्व सुविधांयुक्त असे मच्छी मार्केट उदयास येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. दिवाळे गाव हे नवी मुंबईतील पाहिले स्मार्ट गाव बनेल असा माझा विश्वास असून त्याकरिता प्रत्येक ग्रामस्थांनी, गावातील लोकप्रतिनिधी, पदाधिकार्‍यांनी संपूर्ण परिसर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन आमदार म्हात्रे यांनी केले. भाजप महामंत्री विजय घाटे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष दत्ता घंगाळे, महामंत्री जगन्नाथ कोळी, समाजसेविका दीप्ती कोळी, अध्यक्ष अनंता बोस, ज्ञानेश्वर कोळी, कैलास कोळी, किशोर नाईक तसेच अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply