दिवाळीच्या खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड; नियमांचे उल्लंघन
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई शहरातील एपीएमसीतील बाजारपेठ गजबजली असून, खरेदीसाठी नागरिकांची गर्दी वाढली आहे. नवी मुंबई महापालिका प्रशासनाकडून सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळण्याचे वारंवार आवाहन करूनही नागरिक बाजारपेठांमध्ये गर्दी करत असल्याचे चित्र बाजारपेठांत दिसत आहे.
विविध रंगाचे आकाश कंदील, देशी आणि परदेशी बनावटीची विद्युत रोषणाई, खाद्यपदार्थ, मिठाई, फोर्मिंगचे दागिने आणि पणत्या, रांगोळ्यांनी बाजारपेठ सजली आहे. या बाजारपेठेत खरेदीसाठी ग्राहकांनी सामाजिक अंतराला फाटा देत, सरकारच्या नियमांचा अक्षरश: फज्जा उडालेला आहे.
गर्दीच्या अनेक ठिकाणी सॅनिटायझर, मास्कचा फारसा वापर होत नसल्याचे चित्र घणसोली नोड्स आणि गावठाण, तुर्भे मफको मार्केट, ऐरोली सेक्टर 4, वाशी सेक्टर 9 येथील मिनी मार्केट आणि एपीएमसी मार्केट परिसरात सध्या दररोज सायंकाळी दिसते आहे. असे असताना महापालिकेच्या विशेष भरारी पथकाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचे चित्र पाहावयास मिळते. सलग आठ महिने बंद असलेली बाजारपेठ काही दिवसांपूर्वी उघडल्यामुळे नागरिक खरेदीसाठी मोठ्या संख्येने बाहेर पडत असल्याने, व्यापारी वर्गात समाधानाचे वातावरण पसरले आहे.
उरण बाजारपेठेत स्वदेशी वस्तूंना मागणी
उरण : वार्ताहर
दिवाळीनिमित्त उरण बाजारपेठेत विविध आकाराचे प्रकारचे आकाश कंदील विकण्यास आले असून या वर्षी नागरिकांचा कल भारतीय बनावटीच्या वस्तू खरेदी करण्याकडे दिसून येत आहे.
भारतीय बाजारपेठ नेहमीच चीनच्या वस्तूंचा दबदबा असल्याचे पाहवयास मिळत असे. आकर्षक आणि भारतीय वस्तूच्या तुलनेत स्वस्त असल्याने या वस्तू खरेदीसाठी ग्राहकाकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत होते. मात्र या वर्षी चीनने सीमेवर केलेले कुरघोडी खरेदीशी वापर बाबत सुरु झालेल्या जनजागृतीमुळे नागरिकांचा कल स्वदेशीकडे दिसत आहे.
उरण मधील बाजारपेठेत घरगुती बनावटीच्या पणत्या, कंदील पहावयास मिळत आहे. पणत्या 50 रुपयांस 12 नग, 60 रुपयांस 12 नग व लहान 25 रुपयांस 12 नग असे आम्ही विकतो, शिवाजी 20 रुपयांपासून 100 रुपये या किमतीने आम्ही विकतो, असे उरण तालुक्यातील कुंभारवाडा येथील सुरेखा कुंभार यांनी सांगितले.
त्याच प्रमाणे किल्ले स्पर्धेसाठी बच्चे कंपनी मावळे, शिवाजी, अशा वस्तू विकत घेत आहेत. यंदा आकाश कंदील विविध प्रकारचे, आकारचे, आकर्षक असून छोटी आकाश कंदीलास मागणी वाढली आहे. त्याच प्रमाणे रंग, रांगोळी विविध आकर्षक रेडीमेड रांगोळी कागद, आदिंना मागणी वाढली आहे, असे हरीलाल जनरल स्टोरचे यश मेहता यांनी सांगितले.