नवी मुंबई : रामप्रहर वृत्त
लॉकडाऊनमध्ये शिथिलता देताना विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सर्व नियमांचे पालन करून इयत्ता नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा 23 नोव्हेंबरपासून सुरू करण्यासाठी शासनाने परवानगी दिली आहे. त्यानुसार नवी मुंबई महापालिकेच्या शाळा सुरू करण्याची तयारी सुरू आहे. कोरोना काळात शाळा सुरू नसल्या तरी शाळांच्या माध्यमातून ऑनलाइन शिक्षण देणे सुरू आहे. अनलॉकमध्ये विविध गोष्टींत शिथिलता देताना नववी ते बारावीतील विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्षात शाळा सुरू करण्याच्या अनुषंगाने 23 नोव्हेंबरपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यादरम्यान, विद्यार्थ्यांनी मास्क, सोशल डिस्टन्स, सॅनिटायझर आदी गोष्टींचा वापर करणे बंधनकारक असून पालिकेच्या माध्यमातून शहरातील शाळांना सूचना दिल्या आहेत. शाळेची स्वच्छता, निर्जंतुकीकरण फवारणी आदी कामे केली जाणार आहेत. विद्यार्थ्यांना मास्क, सॅनिटायझर आदी सुविधा पुरविण्यात येणार आहेत. शाळेत येणार्या विद्यार्थ्यांचे तापमान मोजण्यासाठी थर्मल गन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. शाळा सुरू करण्यापूर्वी शिक्षक, शाळेतील कर्मचार्यांची आरटीपीसीआर चाचणी गुरुवारी नेरूळ येथील लॅबमध्ये करण्यास सुरुवात झाली. महापालिकेच्या माध्यमातून शहरातील खाजगी शाळांमधील शिक्षकांची आरटीपीसीआर चाचणीदेखील करून देण्यात येणार आहे.
पालकांमध्ये मात्र भीती
नवी मुंबईत कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात असल्याचे चित्र आहे. गेल्या आठवडाभर 100पेक्षा खाली दररोज रुग्ण आढळत होते, मात्र गुरुवारी ही संख्या 175 पर्यंत गेली आहे. दिवाळीत झालेली गर्दी पाहता रुग्णवाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे पालकवर्ग मुलांना शाळेत पाठविण्यास अजूनही तयार झालेला दिसत नाहीत. शाळा सुरू होत आहे, ही आनंदाची बातमी आहे. भीती वाटत असल्याची भावना पालकांनी व्यक्त केली आहे.
शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार शाळा सुरू करण्याची तयारी करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. महापालिकेच्या शिक्षकांबरोबर शहरातील खाजगी शाळांच्या शिक्षकांची आरटीपीसीआर चाचणी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. -संजय काकडे, अतिरिक्त आयुक्त, न.मुं.म.पा.