नवी मुंबई : रामप्रहर वृत्त
नवी मुंबई पालिकेने कोरोनाच्या वाढत्या रुग्णांना आरोग्य सेवा देण्याची तयारी सुरू केली आहे. नवी मुंबईत दोन दिवसांत करोना रुग्णांची संख्या लक्षवेधी वाढलेली आहे. यासाठी वैद्यकीय अधिकार्यांच्या रजा रद्द करण्यात आल्या असून दिवसाला प्रतिजन व आरटीपीसीआरच्या चार हजार तपासण्या पुन्हा सुरू करण्याचे आदेश पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी गुरुवारी (दि. 19) दिले आहेत. दिवाळीपूर्वी नवी मुंबईत कमी झालेली कोरोना रुग्णांची संख्या दिवाळीनंतर दोन दिवसांत वाढली आहे. बुधवारी 131 तर गुरुवारी 175 रुग्ण आढळून आल्याचे दिसून आले आहे. दिवाळीत खरेदीसाठी बाजारात जमलेली गर्दी पाहता नवी मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या दिवाळीनंतर वाढणार याचा अंदाज प्रशासनाने बांधला होता. नवी मुंबईत दोन दिवसांत दोनशेच्या जवळपास कोरोना रुग्ण आढळून येऊ लागले असून ही संख्या येत्या 28 दिवसांत वाढण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे. त्यामुळे दिवाळीच्या काळात बंद झालेल्या वैद्यकीय अधिकार्यांच्या बैठका आता पुन्हा सुरू करण्यात आल्या असून वैद्यकीय अधिकार्यांशी व्हिडीओ संवाद साधण्यात आला आहे. येत्या दोन दिवसांत चार हजार तपासण्या घेण्यास सुरुवात केली जाणार असून त्यासाठी प्रयोगशाळा तैनात करण्यात आलेल्या आहेत. याशिवाय नागरिकांशी संवाद साधण्यासाठी सुरू करण्यात आलेले कॉल सेंटर पुन्हा कार्यान्वित करण्यात येणार असून शहरातील आठ ते नऊ हजार नागरिकांशी संवाद साधला जाणार आहे. त्यांना काही लक्षणे आढळून आल्यास वेळीच उपचार केले जाणार आहेत. यापूर्वी असलेले वैद्यकीय कर्मचारी व अधिकारी सेवेत कायम ठेवण्यात आले असून त्यांच्या रजा रद्द करण्यात आलेल्या आहेत. या काळात कंत्राटी सेवेत असलेले वैद्यकीय कर्मचारी हे दुसर्या सेवेत जाण्याची शक्यता लक्षात घेऊन एकाही व्यक्तीला सोडण्यात येऊ नये, अशा सूचना प्रशासनाने दिलेल्या आहेत.
एपीएमसी हद्दीत अधिक लक्ष
15 डिसेंबपर्यंत सर्व यंत्रणा सज्ज करण्यात आली असून दोन हजार 800 प्राणवायू रुग्णशय्या तयार ठेवण्यात आल्या आहेत, तर अत्यवस्थ रुग्णांसाठी 450 रुग्णशय्या विविध रुग्णालयांत सज्ज आहेत. दोन दिवसांत या सर्व यंत्रणा कार्यान्वित केल्या जातील अशी तयारी केली गेली आहे. नवी मुंबईतील एपीएमसीमुळे रुग्णसंख्या वाढण्याची शक्यता अधिक असून दिवाळीच्या काळात या क्षेत्रात कोरोना गेल्याच्या आविर्भावात खरेदी केली जात असल्याचे चित्र होते. त्यामुळे या भागात अधिक लक्ष दिले जाणार आहे.
दुसरी लाट येईलच असे काही अनुमान काढता येणार नाही, पण प्रशासनाला पुन्हा सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यासाठी वैद्यकीय अधिकार्यांच्या रजा रद्द करून त्यांच्याशी संवाद वाढविण्यात आला आहे. कॉल सेंटरवरून नागरिकांच्या प्रकृतीची चौकशी केली जाणार असून दिवसाला साडेतीन ते चार हजार कोरोना तपासण्या सुरू केल्या जाणार आहेत. या साथीचा सामना करण्यासाठी नागरिकांचे सहकार्य महत्त्वाचे आहे.
– अभिजित बांगर, आयुक्त, नवी मुंबई