Breaking News

द्रुतगती मार्ग बनला धोकादायक

 अनेक ठिकाणी लेन खचली; आयआरबीकडून कानावर हात

खालापूर : प्रतिनिधी

तालुक्यातील आडोशी गावाच्या हद्दीत काही ठिकाणी मार्गिका खचल्यामुळे मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग अधिकच धोकादायक बनला आहे.

भारतातील पहिला सहापदरी द्रूतगती मार्ग म्हणून मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग ओळखला जात होता. सुरक्षित आणि जलद प्रवास या हेतुने बांधण्यात आलेला हा महामार्ग सध्या अपघात, लूटमार आणि वीकएण्डला होणार्‍या वाहतूककोंडीमुळे जास्त

चर्चेत आहे. मुंबईहून पुण्याकडे जाताना आडोशी गावाच्या हद्दीत दुसर्‍या आणि तिसर्‍या मार्गिकेतील (लेन) रस्ता काही ठिकाणी खचला आहे. त्यामुळे काँक्रिटचा रस्ता वर-खाली झाला असून त्यावर डांबर टाकून केलेली मलमपट्टी फारशी लागू पडलेली नाही. खचलेला भाग दबल्यामुळे काही ठिकाणी काँक्रिट वर आले आहे. वर आलेला रस्त्याचा भाग अतिशय धोकादायक स्थितीत आहे. पहिली मार्गिका अवजड वाहनासाठी तर दुसरी मार्गिका हलक्या वाहनासाठी असून वेगात जाणार्‍या वाहनाच्या टायरला फटका  बसल्यास जिवघेण्या अपघाताची शक्यता आहे. काँक्रिटवर डांबरचा थर देवूनसुद्धा खड्डे नजरेत भरत आहेत.

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाचा देखभाल दुरूस्तीचा ठेका पुन्हा आयआरबीला मिळाला आहे. या मार्गावरून जाणार्‍या वाहनचालकांकडून सक्तीने टोलवसुली करताना प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने मात्र हयगय होत आहे. आयआरबीकडून धोकादायक मार्गिका दुरूस्तीसाठी पाठपुरावा होणे आवश्यक आहे. मात्र त्याची गांभीर्याने दखल घेतली जात नसल्याने अपघाताची टांगती तलवार कायम आहे.

याबाबत आयआरबीचे अभियंता भोईटे यांना विचारले असता, द्रुतगती महामार्गाच्या दुरूस्तीचे काम जयहिंद या कंत्राटदाराला देण्यात आले आहे. मात्र वर्षभरापासून मार्गाची दुरूस्ती रखडली आहे. अधिक माहिती वरिष्ठ देतील, असे सांगून त्यांनी वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला.

20 वर्षात सुरक्षेच्या दृष्टीने ठोस कामे द्रुतगती मार्गावर झाली नाहीत. टोलवाढ मात्र नियमित केली जाते. द्रुतगती मार्गावरून दररोज आयआरबी अभियंते ये-जा करतात. त्यांची याबाबत उदासीनता अपघाताला आमंत्रण देत आहे. खचलेली मार्गिका पाहून वाहनचालक अचानक वेग कमी करतो आणि त्यामुळे पाठीमागून वेगात आलेले वाहन एकमेकांवर आदळून अपघाताच्या घटना घडतात.

-प्रशांत पाटील, माहिती अधिकार कार्यकर्ता

बोरघाटात वाहनांना अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. मार्गिकेमध्ये चढउतार होत असताना खचलेल्या मार्गात तीक्ष्ण धार निर्माण होते. त्याने गरम झालेल्या वाहनांचे टायर फाटून अनेक वाहनांचे अपघात झाले आहेत.

-मनोज कळमकर, खालापूर

Check Also

कोप्रोली येथे पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ

भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल : रामप्रहर वृत्त केंद्र सरकारची महत्त्वपूर्ण योजना …

Leave a Reply