भाजपच्या प्रयत्नांना यश
कर्जत : बातमीदार, प्रतिनिधी
मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील शेडुंग टोल नाका येथे कर्जत तालुक्यातील वाहनांना टोल भरावा लागत होता. त्याविरुद्ध भाजप किसान मोर्चाचे कोकण संघटक सुनील गोगटे यांनी आवाज उठविला होता. याबाबत त्यांनी आंदोलन करण्याचा इशारा दिल्यानंतर आयआरबी प्रशासन जागे झाले असून, त्यांनी कर्जतच्या वाहनांना टोलमध्ये सूट देण्याचा निर्णय घेतला आहे.
कर्जत भारतीय जनता पक्षाच्या वतीने शेडुंग टोल नाक्यावरील टोल रद्द करावा, अशी मागणी करण्यात आली होती. त्या संदर्भात 10 डिसेंबर रोजी टोलवसुली करणार्या आयआरबी कंपनीला निवेदन दिले होते. कर्जत तालुक्यातील वाहनांना टोल माफ करावा, अन्यथा आम्ही धरणे आंदोलन करून रस्ता अडवू, असा इशारा या निवेदनात देण्यात आला होता. अखेर आयआरबीने ही मागणी मान्य केल्याने कर्जतकरांना टोलमध्ये मोठी सूट मिळाली आहे.
कर्जत तालुक्यातील रजिस्ट्रेशन असलेल्या गाड्यांना 300 रुपयांत लोकल मासिक पास देऊ आणि कधीतरी प्रवास करणार्या व्यक्तीकडून एकतर्फी प्रवासास 10 रुपये याप्रमाणे टोल वसूल करू, असे लेखी आश्वासन आयआरबी कंपनीने दिले आहे. या वेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष वसंत भोईर, जिल्हा सरचिटणीस दीपक बेहेरे, जिल्हा चिटणीस रमेश मुंढे, तालुका अध्यक्ष मंगेश म्हसकर, कर्जतचे उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल आदी उपस्थित होते. जाचक टोल अगदी माफक झाल्यामुळे कर्जतमधील वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.