Breaking News

खोपोलीत पाण्यासाठी संतप्त महिलांचा पालिकेवर धडक मोर्चा

खोपोली : प्रतिनिधी  
नगरपालिका हद्दीतील लौजी गावात गेल्या अनेक महिन्यांपासून पिण्याच्या पाण्याच्या समस्येने त्रस्त असलेल्या महिलांनी सोमवारी (दि. 21) रिकाम्या भांड्यांसह नगरपालिका कार्यालयावर धडक दिल्याने प्रशासनाची तारांबळ उडाली. विशेषत: नगरपालिकेच्या पाणीपुरवठा खात्याच्या गलथान कारभारामुळे आम्हाला पाणी मिळत नाही, असा संतप्त महिलांचा सूर होता.
 अपुरा पाणीपुरवठा, अनेकदा पाण्यामध्ये किडे सापडणे असे प्रकार अनेक महिन्यांपासून लौजी ग्रामस्थ अनुभवत आहेत. याबाबतही ग्रामस्थांनी अनेकदा नगरपालिकेच्या पाणीपुरवठा खात्याला तक्रारी दिल्या होत्या, मात्र त्यावर समाधानकारक कार्यवाही न झाल्यामुळे अखेर सोमवारी महिलांनी रिकाम्या भांड्यांसह नगरपालिका कार्यालयावर धडक दिली. या वेळी नगराध्यक्ष सुमन अवसरमल यांना महिलांच्या वतीने निवेदन देण्यात आले. येत्या दोन दिवसांत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व्हावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. या वेळी नगरसेवक मोहन अवसरमल, स्थानिक नगरसेवक मंगेश दळवी नगराध्यक्षांच्या दालनामध्ये उपस्थित होते. नगराध्यक्षांनी निवेदनाची प्रत स्वीकारून यावर तातडीने कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन संतप्त महिलांना दिले.
तत्पूर्वी संतप्त महिलांनी पाणीपुरवठा अधिकार्‍यांनाही   निवेदनाची प्रत देऊन धारेवर धरले. या वेळी गुलाबताई पाटील, नलिनी पाटील, किशोर पाटील, सुदेश थरकुडे, अरविंद पाटील यांच्यासह लौजी गावातील महिला व ग्रामस्थ उपस्थित होते.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply