पंतप्रधान नरेंद्र मोदींची माहिती; राजकोटमध्ये रुग्णालयाचे भूमिपूजन
राजकोट : वृत्तसंस्था
जगातील सर्वांत मोठी कोरोना लसीकरण मोहीम राबविण्याच्या दृष्टीने भारतात तयारी सुरू आहे. लसीकरणाची तयारी सध्या शेवटच्या टप्प्यात असून, देशात निर्मिती झालेल्या लशीचा डोस नागरिकांना मिळेल, अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. ते गुरुवारी (दि. 31) गुजरातमधील राजकोट येथे एम्स रुग्णालयाच्या भूमिपूजन समारंभात बोलत होते.
सन 2020ने आपल्याला आरोग्य हीच संपत्ती आहे हे चांगलेच शिकवले. सरते वर्ष अनेक आव्हाने घेऊन आले. सध्या देशातील कोरोनाबाधितांची संख्या कमी होत चालली आहे. भारत जागतिक आरोग्याचे मुख्य केंद्र म्हणून उदयास आले आहे. 2021मध्ये आपल्याला आरोग्यसेवेसाठी भारताची भूमिका बळकट करावी लागेल, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
या वेळी पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधला. 2014मध्ये आपले आरोग्य क्षेत्र वेगळ्याच दिशेला होते. वेगवेगळ्या दृष्टिकोनातून काम केले जात होते. प्राथमिक आरोग्य केंद्राचाही वेगळीच प्रणाली होती. गावात योग्य सुविधा मिळत नव्हत्या, असे त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, योग्य वेळेत पावले उचलल्याने आज आपण चांगल्या स्थितीत आहोत. 130 कोटी लोकसंख्या असणार्या आपल्या देशात एक कोटी लोकांनी कोरोनाविरोधातील लढाई जिंकली आहे.
2020मध्ये कोरोनामुळे निराशा होती. चारही बाजूला अनेक प्रश्न होते, पण आता 2021 नवी आशा घेऊन येत आहे, असे पंतप्रधान मोदींनी नमूद केले.