चिमुकलीवरील बलात्कार व हत्येचा तीव्र निषेध
पेण : प्रतिनिधी
पेणजवळील आदिवासी वाडीतील तीन वर्षीय बालिकेवर झालेल्या बलात्कार व हत्येप्रकरणी गुरुवारी (दि. 31) सर्व राजकीय पक्ष, विविध संघटनांच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. शहरातील व्यापारी व दुकानदारांनी उत्स्फूर्तपणे बंद पाळून या मोर्चास पाठिंबा दर्शविला. दरम्यान, गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले.
सर्वपक्षीय मोर्चात आमदार रविशेठ पाटील, नगराध्यक्ष प्रीतम पाटील, माजी आमदार धैर्यशिल पाटील, भाजप जिल्हा प्रवक्ते मिलिंद पाटील, चिटणीस बंड्या खंडागळे, तालुकाध्यक्ष श्रीकांत पाटील, शहर अध्यक्ष हिमांशू कोठारी, उपाध्यक्ष अजय क्षीरसागर, सामाजिक कार्यकर्त्या वैशाली पाटील, सुरेखा दळवी, सह्याद्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष समीर म्हात्रे, पालिका गटनेते अनिरुद्ध पाटील, जि. प. सदस्य नीलिमा पाटील, प्रमोद पाटील, भाजप युवा नेते ललित पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे दयानंद भगत, चैताली पाटील, सुचिता चव्हाण, शिवसेनेचे नरेश गावंड, अविनाश म्हात्रे, दीपश्री पोटफोडे, मनसेचे संदीप ठाकूर, रूपेश पाटील, सपना देशमुख, पीआरपी अॅड. प्रमोद कांबळे, सीताराम कांबळे, आदिवासी-ठाकूर संघटनेचे जोमा दरोडा, संतोष वाघ, नगरसेवक-नगरसेविका, पदाधिकारी, कायकर्ते, नागरिकांसह मी पेणकर शाश्वत कमिटीचे सदस्य सहभागी झाले होते.
शहरातील महात्मा गांधी मंदिर येथे सकाळी 10 वाजल्यापासून नागरिक जमा होऊ लागले. या वेळी झालेल्या सभेत नेते, पदाधिकारी तसेच सामाजिक व आदिवासी संघटनांच्या प्रतिनिधींनी बालिकेवर झालेल्या अमानवी कृत्याचा निषेध करीत नराधमाला फाशी देण्याची मागणी केली. यानंतर सभेचे रूपांतर मोर्चात होऊन तो तहसील कार्यालयावर धडकला. उपविभागीय अधिकारी विठ्ठल इनामदार व तहसीलदार अरुणा जाधव यांनी मोर्चेकर्यांना सामोरे जात त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. या वेळी विविध संघटनांनी पीडितेच्या कुटुंबीयांना न्याय मिळण्यासाठी प्रांताधिकारी व तहसीलदारांना निवेदन दिले. दरम्यान, नगराध्यक्षा प्रीतम पाटील व अन्य महिलांनी गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांची भेट घेऊन गुन्हेगाराला कठोर शासन व्हावे, अशी मागणी त्यांच्याकडे केली.