अलिबाग ः प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यातील पुरवठाविषयक बाबींसंदर्भात विविध व्यावसायिक, तालुका पुरवठा शाखेतील अधिकारी-कर्मचार्यांची शुक्रवारी (दि. 25 मार्च) जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे जिल्हा पुरवठा अधिकारी मधुकर बोडके यांच्या अध्यक्षतेखाली कार्यशाळा झाली.
या कार्यशाळेमध्ये उपनियंत्रक, वैधमापन शास्त्र राम राठोड, अन्न व औषध प्रशासन विभागचे जिल्हा सहाय्यक आयुक्त लक्ष्मण दराडे, भारत पेट्रोलियम गॅस कंपनीचे मॅनेजर विशाल काबरा, आयओसी. कंपनीचे मणिकंदन मुरलीधरन यांनी मार्गदर्शन केले.
तर रायगड जिल्हा रास्त भाव धान्य दुकानदार संघटनेचे कार्याध्यक्ष शेखर देशमुख, पेट्रोल पंप धारक बाळकृष्ण पाटील, शिवभोजन केंद्र चालक जेधे, रास्त भाव धान्य दुकानदार सुधागड तालुकाध्यक्ष हरिश्चंद्र पाटील, रास्त भाव धान्य दुकानदार कौस्तुभ जोशी, अच्युत आपटे व माणगाव पुरवठा निरिक्षण अधिकारी संजय माने यांनी मनोगत व्यक्त केले.
जिल्हा पुरवठा अधिकारी मधुकर बोडके यांनी पुरवठा विषयक बाबींचे मार्गदर्शन केले. तसेच आगामी काळात शासनाकडून सीएससी सेंटरच्या माध्यमातून राज्यातील रास्त भाव दुकानदार बँकांचे सर्व व्यवहार, रेल्वे विमान तिकिट बुकींग, सर्व प्रकारची बिले, शेतीविषयक सर्व सेवा, इन्कम टॅक्स रिटर्न भरणे, नवीन रेशन कार्ड, दुबार रेशन कार्ड, नावामध्ये दुरुस्ती अर्ज आदी सेवा देऊ शकतील, असे सांगितले.